भाजपने आता तरी सुधारावे.. महाराष्ट्राचा अपमान करू नये.. देशमुखांचा टोला - Graduate Election voters reject bjp for insulting maharastra police anil Deshmukh criticism   | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने आता तरी सुधारावे.. महाराष्ट्राचा अपमान करू नये.. देशमुखांचा टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

भाजपाने आता तरी सुधारावे आणि सरकारला अडचणीत आणण्यासाठी महाराष्ट्राचा अपमान करू नये," असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. 

मुंबई : "महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात नाकारून महाराष्ट्रातील जनतेने आपला संताप व्यक्त केला आहे. जनभावनेचा आदर करून भाजपाने आता तरी सुधारावे आणि सरकारला अडचणीत आणण्यासाठी महाराष्ट्राचा अपमान करू नये," असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. 

देशमुख म्हणाले, "एकेकाळी बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरपंत फडणवीस एकेकाळी निवडून आले होते. परंतु, यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला येथील मतदारांनी नाकारले आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून अभिजित वंझारी यांचा विजय सुकर केला. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांत भाजपाच्या नेतृत्वाने घेतलेल्या महाराष्ट्रविरोधी भूमिकेला विरोध म्हणूनच जनतेने त्यांचा दारुण पराभव केला आहे."

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात संशयकल्लोळ निर्माण करत भाजपाने मुंबई पोलीसांवर अविश्वास दाखविला. केवळ राजकारणासाठी याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला. त्यामध्ये ते तोंडावर पडले. महाराष्ट्राचा अपमान करणारी कंगना रनौट कोणाच्या इशाऱ्यावर बोलत आहे, हे देखील महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. त्यामुळे मतपेटीतून जनतेने भाजपाविरोधातील संताप व्यक्त केला आहे. "होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जम हो तीनो अमर-अकबर-अ‍ॅँथनी" असे मी मागे म्हटले होते. 

शिवसेना- राष्ट्रवादी कॉँग्रेस- कॉँग्रेसच्या महाविकास आघाडीने हे दाखवून दिले आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातही भाजपाचा दारुण पराभव झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही जनताच भाजपाला जागा दाखवून देईल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख