Governor has directed the  Government to clarify the role regarding Examinations and take idecision. | Sarkarnama

राज्यपालांनी सरकारचे पिळले कान ; 'या' परीक्षांबाबत निर्णय घ्या!

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पाठवलेल्या पत्रामुळे हा विषय राज्यभर चर्चिला जाऊ लागला आहे.

पुणे : राज्यातील विद्यापीठांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. शेवटच्या वर्षात परीक्षा न घेता सरसकट उत्तीर्ण करणे नैतिकदृष्टया योग्य होणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पाठवलेल्या पत्रामुळे हा विषय राज्यभर चर्चिला जाऊ लागला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत मार्गदर्शक सूचना मागवणारे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठवले होते. त्यावरून राज्याच्या शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू झाली. शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पदवी प्रदान केली तर त्याचा परिणाम त्यांच्या ‘करिअर’वर होऊ शकतो, अशी भूमिका शिक्षण तज्ञांनी मांडली. त्यावर दोन्ही बाजूनी चर्चा झाली. मात्र, बहुसंख्य तज्ज्ञांनी परीक्षा घेणे आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी भूमिका स्पष्ट करण्याचे व या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठांचा विचार करता पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या संख्या काही लाखांमध्ये आहे. पुणे व मुंबई येथील विद्यपीठ वगळता इतर विद्यापीठांना परीक्षांचे नियोजन करणे फारसे अवघड नाही. या दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी संख्येच्या तुलनेत इतर विद्यापीठातील विद्यार्थी संख्या कमी आहे. मात्र, कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी आवश्‍यक ‘प्रोटोकॉल’ पाळून परीक्षा घेणे या दोन्ही विद्यापीठांपुढील मोठे आव्हान आहे.

विद्यापीठांच्या परीक्षा जुलै ते सप्टेबर या काळात केव्हाही घेणे विद्यापीठांना शक्य आहे. त्यामुळे मुळात परीक्षा रद्द करण्याचा विचार आणि तसा प्रस्ताव येण्याचे कारण नव्हते. मात्र, राज्य सरकारने या स्वरूपाचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविल्याने यावर चर्चा सुरू झाली. या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्र उदय सामंत यांनी आता भूमिका मांडली आहे. 

परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपण पाठविलेला नव्हता. परीक्षांबाबत काय करावे, याबाबत ‘युजीसी’कडून मार्गदर्शक सूचना मागवल्या होत्या. पत्रात तसा स्पष्ट उल्लेख केला होता. या संदर्भात राज्यपाल व कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांना फोन करून त्यांना मी पाठविलेल्या प्रस्तावाची नेमकी माहिती देणार आहे.

उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख