वारकरी संप्रदायाच्या प्रश्नावर शासनाने मौन सोडावे... - The government shouldn't remain silent on the issues of Warkari | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

वारकरी संप्रदायाच्या प्रश्नावर शासनाने मौन सोडावे...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 मार्च 2021

शासन एकीकडे स्वतः म्हणते कोरोनासोबत जगायला शिका आणि एकीकडे वारकरी प्रश्न आले की मात्र मूग गिळून गप्प बसते, असे मत वारकरी संप्रदाय युवा मंचचे राज्य अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी व्यक्त केले.  

दहिवडी : बंडातात्या कऱ्हाडकर यांनी हाक दिलेल्या देहू येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यास वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्राचा पाठिंबा असून या सोहळ्यास हजारो लोक उपस्थित राहतील यात शंका नाही. वारकरी संप्रदायाच्या प्रश्नावर शासनाने आपले मौन सोडावे, असे आवाहन वारकरी संप्रदाय युवा मंचचे राज्य अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी बुधवारी केले.

अक्षयमहाराज भोसले म्हणाले, अत्यंत निष्ठेने व शुद्ध आचरणाने जीवन व्यतित करणारे बंडातात्या कऱ्हाडकर हे व्यक्तीमत्त्व वारकरी संप्रदायाची मुलुखमैदानी तोफ आहे. वारकरी आचार धर्म व परंपरा कशा सांभाळले गेले पाहिजे याबाबत बंडातात्यांचा आदर्श आजचा युवक डोळ्यासमोर ठेवतो आहे. त्यामुळेच त्यांच्या वक्तव्याला, आवाहनाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. कोरोना काळातही संपूर्ण महाराष्ट्रात आठवडी बाजार, व्यापारी पेठा, लग्न समारंभ पूर्णक्षमतेने सुरु असताना फक्त वारकरी उत्सवावरच सरकार निर्बंध लादत आहे. वारकरी वर्गाच्या प्रश्नांना सरकारने सामोरे जाऊन समस्या समजून घेवून त्यावर तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत.

अक्षयमहाराज पुढे म्हणाले, पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी कित्येक मॉल्समध्ये हजारो लोक एकावेळी संचार करतात तेव्हा काही अडचण नाही, मात्र वारी व तत्सम अध्यात्मिक बाब आली की कोरोना निर्बंध संगितले जातात. शासन एकीकडे स्वतः म्हणते कोरोनासोबत जगायला शिका आणि एकीकडे वारकरी प्रश्न आले की मात्र मूग गिळून गप्प बसते. आदरणीय तात्यांना व वारकरी शिष्ट मंडळाला भेटून शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. संतभूमी म्हणून संपूर्ण विश्व ज्या राज्याकडे पाहते अशा महाराष्ट्रात आंदोलनाची वेळ वारकरी संप्रदायावर येणे यासारखे दुर्दैव कोणतेच नाही. 

येत्या आषाढीपर्यंत जे भाविक कोरोना लस घेतील अशांना लसीकरण पत्र पाहून शासनाने प्रवेश द्यावा व याची तयारी सरकारने आतापासून करावी. लसीकरणात सामजिक व अध्यात्मिक संस्था यांना शासनाने सहभागी करुन घेतले तर ते काम तातडीने होईल. लसीकरणानंतरचे फोटो काढण्याचे चोचले शासनाने बंद करावेत व तो वेळ इतर लोकांच्या लसीकरणात घालवावा. सरकार सूज्ञ आहे समाजहितकारक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. वारकरी संप्रदाय शासनास कायम सहकार्य करत आले आहे व पुढेही सहकार्य करेल. मात्र शासनाने देखील समनव्याची भूमिका घेवून मौन सोडण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख