'Given one crore rupees .. still I will not give Sarja ....' | Sarkarnama

'एक कोटी रुपये दिले.. तरीही मी सर्जा देणार नाही....' 

संपत मोरे
गुरुवार, 9 जुलै 2020

सांगोला तालुक्यातील चांदोलवाडी (मेटकरीवाडी) या गावातील बाबू बापू मेटकरी यांच्याकडे एक मेंढा आहे. हा मेंढा सध्या सोलापूर जिल्ह्यासह सोशल मीडियावर चर्चेत आलाय.

पुणे : सांगोला तालुक्यातील चांदोलवाडी (मेटकरीवाडी) या गावातील बाबू बापू मेटकरी यांच्याकडे एक मेंढा आहे. हा मेंढा सध्या सोलापूर जिल्ह्यासह सोशल मीडियावर चर्चेत आलाय. कारण एकच या मेंढ्याला लोकांनी 27 लाख रुपयांपर्यंत बोली लावली आहे  मात्र मेटकरी यांनी 'एक कोटी रुपये दिले.. तरी मी मेंढा देणार नाही.' अशी भूमिका घेतली आहे.

या मेंढ्यांच्या जन्मानंतर चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे मी मेंढा विकणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे." हा माझा हिंदकेसरी आहे," असे मेटकरी सांगत आहेत. कर्नाटकातील इंडी, महाराष्ट्रातील जत, आटपाडी येथील कृषी प्रदर्शनात या मेंढ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे, असे मेटकरी म्हणाले.

सांगोला शहराच्या जवळ मेटकरी यांचे गाव आहे. मेंढीपालन हा त्यांचा व्यवसाय आहे. आता त्यांचा चर्चेत आलेला सर्जा हा दोन वर्षांपूर्वी जन्माला आला आहे. मेटकरी यांना कुस्तीची आवड आहे. त्यांच्या मुलाला त्यांना हिंदकेसरी करायचे होते, मात्र तो काजू बदाम थंडाई हा पैलवानी खुराक देऊनही हिंदकेसरी झाला नाही, मात्र 'माझा सर्ज्या हिंदकेसरी आहे,' असे ते म्हणतात.

इतर मेंढ्यांपेक्षा उंच असलेला, देखणा सर्जा माडग्याळ जातीचा दोन वर्षाचा आहे. मेटकरी त्याला दररोज सकाळ संध्याकाळ 2  लिटर दूध पाजतात. ओला चारा आणि पैलवानी खुराक देतात. सर्जाचे नाक देखणे आहे. नाकामुळे तो खूपच खुलून दिसतोय. जत तालुक्यातील माडग्याळ परिसरात या जातीचे मेंढे आढळतात. तिथे त्यांची पैदास केली जाते. देशभरात त्याला मागणी आहे.

दोन वर्षांपूर्वी  सर्जा जन्मला. त्याच्या जन्माच्या अगोदरची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात फरक पडल्याने बाबू मेटकरी यांना या मेंढ्यात काही विशेष आहे असं वाटतंय तस ते बोलून दाखवतात. दिसायला देखणा आणि त्याच्या जन्मानंतर परिस्थितीत झालेला बदल यामुळे मेटकरी सर्जाच्या प्रेमात पडले आहेत. दिसायला देखणा असल्याने त्याला मागणीही आहे.  देखणेपणामूळे सर्जाला सांगली जिल्ह्यातील जत भागातून 27  लाखापर्यंत बोली लावली आहे मात्र 1 कोटी रुपये आले तरी सर्जाला विकणार नाही, असं बाबू मेटकरी सांगत आहेत. 

Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख