मोठी बातमी : हिरण हत्या प्रकरणी पाच जणांना अटक..गुन्ह्याची कबुली - Gautam Hiran Five people have been arrested for kidnapping and killing businessman Gautam Hiran | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : हिरण हत्या प्रकरणी पाच जणांना अटक..गुन्ह्याची कबुली

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 मार्च 2021

गौतम हिरण यांचे पैशांसाठी अपहरण करुन हत्या करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे पैशांसाठी अपहरण करुन हत्या करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने प्रारंभी दोन संशयित निष्पन्न करुन त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर काल रात्री नाशिक येथून संदीप मुरलीधर हांडे (वय २६, रा. माळेगाव, ता. सिन्नर) याला पकडले. त्यानंतर अवघ्या काही तासात जुनेद उर्फ जावेद बाबु शेख (वय २५, रा. सप्तश्रृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर), अजय राजू चव्हाण (वय २६, रा. पास्तेगाव, मारुती मंदीरासमोर, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (वय २९, रा. उक्कडगाव, ता. कोपरगाव) यांच्यासह आणखी एकास विविध ठिकाणाहून अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक डाँ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांच्यासह पथकातील सहायक पोलीस निरिक्षक मिथून घुगे, गणेश इंगळे, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलिस हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर उपस्थित होते.
 
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके जिल्हा पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करुन गुन्ह्याचा तपास करीत होते. गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा करतांना कोणताही पुरावा मागे राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. श्रीरामपूर शहर हे मोठी व्यापारी बाजारपेठ असल्याने गुन्हा घडला त्यावेळी आणी त्यानंतरच्या काळात शहरात अनेक लोकांची ये-जा झालेल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. 

पोलिसांनी काल रात्री नाशिक येथून संदीप हांडे याला ताब्यात घेवून चौकशी केली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जुनेद शेख, अजय चव्हाण, नवनाथ निकम यांच्यासह आणखी २२ वर्षीय एकास अटक केली.

आरोपींनी गुन्हाची कबुली देत गुन्ह्याचा घटनाक्रम सांगितल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. आरोपींचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना विविध ठिकाणाहून अटक केली. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणले असून आरोपींकडून मयत हिरण यांच्या मोबाईलसह चेकबुक आणि काही कागदपत्रांसह गुन्ह्यासाठी वापरलेली (एमएच- १५- जीएल- ४३८७) क्रमांकाची मारुती व्हॅन पोलीसांनी जप्त केली आहे. 

तपास पोलीस उपअधीक्षक मिटके करीत आहे. बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे (एक मार्च) रोजी बेलापूर-राहुरी बाह्यवळण परिसरातून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. 

यासंदर्भात पंकज हिरण यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर (सात मार्च) रोजी अपहरण केलेल्या आरोपींनी हिरण यांची हत्या करुन येथील वाकडी रस्त्यावरील यशवंतबाबा चौकी परिसरात मृतदेह आणून टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अपहरण केलेल्या आरोपीविरुध्द गुन्ह्याचे कलमे लावली होती. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून विशेष पोलीस महानिरीक्षक डाँ. प्रतापराव दिघावकर, पोलिस अधीक्षक पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. काळे यांनी बेलापूर आणि वाकडी शिवारात भेट देवून तपासाची चक्र फिरवून चार पथके रवाना केली.

 ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली संदिप घोडके, विश्वास बेरड, पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, विजय ठोंबरे, सचिन आडबल, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, दिपक शिंदे, विशाल गवांदे, पोलीस शिपाई योगेश सातपूते, संदीप दरंदले, रविंद्र डुंगासे, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, मयूर गायकवाड, मेघराज कोल्हे, राहूल सोळूंके, रोहीत येमूल, आकाश काळे, उमाकांत गावडे, भरत बुधवंत, अर्जून बडे, बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर यांच्यासह सायबर सेलचे पोलीस नाईक फुरकान शेख, पोलीस शिपाई प्रमोद जाधव यांनी केली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख