Free corona test for Ganesha devotees  | Sarkarnama

गणेशभक्तांची मोफत कोरोना चाचणी करा...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 जुलै 2020

कोरोनाचा फैलाव कोकणात होऊ नये म्हणून तेथे जाणाऱ्या भाविकांची विनामूल्य कोरोना चाचणी करावी, "अशा मागण्या साटम यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.

मुंबई : "यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची राज्य सरकारने विनाशुल्क कोरोना चाचणी करावी तसेच त्यांच्यासाठी मोफत किंवा सवलतीच्या दराने एसटी बसगाड्यांची सेवा उपलब्ध करून द्यावी," अशी मागणी अंधेरी (प.) येथील भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे.  

"सध्या कोरोनाचा फैलाव आणि टाळेबंदी यामुळे सर्वचजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्याच्या स्थितीत सोशल डिस्टन्सिंगमुळे एसटी गाडीत अर्धेच प्रवासी नेले जातात. त्यामुळे एसटीचे भाडे दुप्पट-तिप्पट होणार असल्याने ते सामान्य भाविकांना परवडणार नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारने विनामूल्य किंवा फारतर नेहमीच्या भाड्याच्या वीस टक्के दरात एसटीगाड्या उपलब्ध करून द्याव्यात. कोरोनाचा फैलाव कोकणात होऊ नये म्हणून तेथे जाणाऱ्या भाविकांची विनामूल्य कोरोना चाचणी करावी, "अशा मागण्या साटम यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जाणार का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकारमान्यांना एक गुड न्यूज दिली आहे. कोरोनाची खबरदारी घेऊन काही नियम व अटींवर कोकणात गणपतीसाठी एसटी सोडण्यात येणार आहेत. या मुद्यांवरून अनेक दिवस राजकारण तापले होते. या वादात अनेक नेत्यांनी उडी घेतली होती.  

अनिल परब म्हणाले,  "मुंबई , पुणे या परिसरातून येणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात गणपतीसाठी जाता यावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहोत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारी यंत्रणा सक्षम केली जात आहे. आयसीएमआर, आरोग्य विभागाकडून आम्ही गाईडलाईन्स मागवल्या आहेत.  राज्य सरकार त्याविषयी अधिक माहिती घेत आहे.  नियमांचे पालन करूनच गणेशभक्तांना कोकणात जाता येणार आहे"

"गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या लोकांना अडचणी आहेत, तर बकरी ईद साजरा करणाऱ्यांना मात्र सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत” अशी टीकाही मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती.  देशपांडे म्हणाले होते की “गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या लोकांना अडचणी आहेत, तर बकरी ईद साजरा करणाऱ्यांना मात्र सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत.  कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी सरकार बसची सोय करु शकत नसेल, तर  मनसे या बसची सोय करेल, त्यासाठी  आम्हाला सरकारने परवानगी द्यावी," अशी मागणी संदीप देशपांडे यांनी सरकारकडे केली होती. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला होता. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकणातील गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करता येईल यावर मुंबईतील बैठकीत चर्चा झाली होती. मुंबईतील चाकरमानी कोकणात कसे जातील आणि त्यांची राहण्याची व्यवस्था हे दोन विषय होते. कोकणात गेल्यावर त्यांना क्वारंटाईन कुठे आणि कसे करायचे, यावर या बैठकीत  चर्चा झाली होती.  दुर्दैवाने कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा सामना करण्यासाठी वैद्यकीय सुविधा किती आहे यावरही चर्चा बैठकीत करण्यात आली होती.   

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यांतर्गत प्रवासावर निर्बंध असले, तरी मुंबई परिसरातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येणार आहे. त्यासाठी चाकरमान्यांना ई पास देण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याचे राज्य सरकारने यापूर्वी म्हटले होते. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी अधीर झालेल्या चाकरमान्यांसाठी बसची सुविधा, ई पासची व्यवस्था, क्वारंटाईनचा कालावधी, वैद्यकीय सुविधा या मुद्द्यांवर अनिल परब यांनी  कोकणातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली होती. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख