"भाजपचे आंदोलन म्हणजे, महाराष्ट्रद्रोही नेत्यांचा फार्स" - Former Congress MLAs criticize BJP's agitation | Politics Marathi News - Sarkarnama

"भाजपचे आंदोलन म्हणजे, महाराष्ट्रद्रोही नेत्यांचा फार्स"

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

दिल्लीतील नेत्यांशी भांडून फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रासाठी अधिकाधिक फायदा मिळवून द्यायला हवा होता.

पुणे :  कोरोनाच्या संकटात भाजपने केलेले महाराष्ट्र बचाव आंदोलन म्हणजे महाराष्ट्रद्रोही नेत्यांचा निव्वळ फार्स आहे, अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे. 

कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. खरे तर कोरोनाशी आपले युद्ध चालू आहे. या युद्धातील या सर्व सहभागी सैनिकांचा सन्मान जनतेने टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले. जनतेनेही त्यांना साथ दिली. पण, त्यांच्याच पक्षातील नेते मात्र, महाराष्ट्र बचावच्या नांवाखाली काळी झेंडे दाखवून सैनिकांचा अपमानच करीत आहेत. 

कोरोनाचा सामना आपण एकजुटीने करू, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. परंतु, कृती मात्र त्याविरोधात केलेली आहे. दिल्लीतील नेत्यांशी भांडून फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रासाठी अधिकाधिक फायदा मिळवून द्यायला हवा होता. ते काम त्यांनी केले नाही. राज्य सरकारच्या कामात काही चुका असतील तर त्या सरकारातील लोकांशीच बोलून दुरुस्त करुन घ्यायला हव्या होत्या. पण, त्याऐवजी भाजपचे नेते राजभवनावर जावून गाऱ्हाणी मांडत होते. भाजपच्या नेत्यांना मार्ग काढण्याऐवजी सरकार अडचणीत कसे येईल हे पाहाण्यातच अधिक स्वारस्य आहे. 

 

आंदोलनाचा पुणेकरांचा प्रतिसाद नाही 

या पक्षाच्या आमदारांनी आपला निधी मुख्यमंत्री फंडाला देण्याऐवजी पंतप्रधान फंडाला दिला यातच त्यांचा महाराष्ट्रद्रोह दिसून येतो. अशा महाराष्ट्रद्रोही नेत्यांनी प्रसिद्धीचा स्टंट करण्यासाठी आंदोलनाचा फार्स केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडी महाराष्ट्र सावरण्यासाठी काम करत असताना भाजपने चालवलेला फार्स महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. भाजपच्या नेत्यांना माफ करणार नाही. भाजपच्या पुण्यातल्या नेत्यांनीही आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला पुणेकरांनी काडीचाही प्रतिसाद दिलेला नाही. भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख