गोपीचंद पडळकर यांच्या भावावर गुन्हा दाखल : सहकार खात्यातील अधिकारीही आरोपी - fir against brother of Gopichand Padlakar in sangli | Politics Marathi News - Sarkarnama

गोपीचंद पडळकर यांच्या भावावर गुन्हा दाखल : सहकार खात्यातील अधिकारीही आरोपी

विजय पाटील
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

किरकोळ कारणावरून वाद की राजकीय पार्श्वभूमी?

सांगली : जिल्ह्यातील मासाळवाडी येथील मंदिरात चप्पल घालून आल्याच्या वादातून दोन गटात राडा झाला आहे. आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात मारामारी झाली असून, यावेळी दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती  ब्रह्मनंद पडळकर यांचा समावेश आहे. दरम्यान ब्रह्मदेव पडळकर यांनी या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गावातील मंदिरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने काहीजण चप्पल घालून आले होते. त्यावेळी मंदिरात चप्पल घालून का आला ? यावरुन वादा झाला होता, यातून बाचाबाचीस सुरवात झाली आणि नंतर ती मारामारीत रुपांतरीत झाली.  या राड्यात त्याठिकाणी असणाऱ्या 2 दुचाकींची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी पोलीसांवर दबाव आणला, असा आरोप ब्रह्मानंद पडळकर यांनी केला. माझ्या गाडीची तोडफोड करून माझ्या गळ्यातील चेन व गाडीतील रोख रक्कम चोरून नेली आहे व मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे याबाबत मी पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. पिवळ्या दिव्याची गाडी माझ्या गाडीला आडवी लावून मला गाडीतून बाहेर खेचले व मारहाण केली, असे त्यांनी फिर्यादित म्हटले आहे. 

या गुन्ह्यामध्ये सहकार विभागाचे  सहआयुक्त डॉक्टर सचिन मोटे हे प्रमुख आरोपी आहेत.  विनायक मासाळ, राहुल मासाळ, अक्षय अर्जुन, राजू अर्जुन, प्रा.एन पी खरजे हे मुख्य आरोपीचे साथीदार आहेत त्यांच्यावरती गुन्हा नोंद झाला आहे. सचिन मोटे यांनीही या प्रकाराशी संंबंध नसल्याचे म्हटले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख