अतिवृष्टी भागातील शेतकर्‍यांना  देवेंद्र फडणवीस भेटणार - To farmers in flood prone areas Devendra Fadnavis will meet | Politics Marathi News - Sarkarnama

अतिवृष्टी भागातील शेतकर्‍यांना  देवेंद्र फडणवीस भेटणार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

देवेंद्र फडणवीस हे ता. 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत.

मुंबर्ई : राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ता. 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत.

ता. 19 ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी, ता. 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी ता. 21 रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करावा, जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. परतीच्या पावसाने राज्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कर्जबाजारी असलेला शेतकरी हताश झाला आहे. तो आता सरकारच्या मदतीची अपेक्षा करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थिती असलेल्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीम बरोबर बैठक घेऊन जी काही मदत देता येईल, त्याची तात्काळ घोषणा करावी, अशी मागणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.  

हेही वाचा : शरद पवार शेताच्या बांधावर..मुख्यमंत्री दूरचित्रवाणीवर...? 

मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र अजूनही घरात बसूनच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेण्यात मग्न आहेत. शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर असणार आहेत. ता. १८ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे.

आंध्र ओडिशा आणि तेलंगणा राज्याला अशाच अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसला आहे. तेथील मुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहण्या केल्या असून हवाई दौरेही काढले आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र अजूनही घराबाहेर पडलेले नाहीत, असे तरी सध्याचे चित्र आहे.  

राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री हे फक्त दुरचित्रवाणीवरून शेतकऱ्यांना दिलासा देणार की नुकसानग्रस्त भागाचा दैारा करणार हे लवकरच समजेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख