काॅंग्रेसमध्ये शिंदेशाहीचा अस्त? : सुशीलकुमारांना नव्या कार्यकारिणीत स्थान नाही

सोलापुरातही काॅंग्रेसची बिकट अवस्था!
SushilkumarShinde_260719_F_1.jpg
SushilkumarShinde_260719_F_1.jpg

पुणे :  काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय पातळीवर काल जाहीर केलेल्या संघटनेच्या फेरबदलांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. इंदिरा गांधी ते राहुल गांधी यांच्यापर्यंत गांधी परिवाराबरोबर एकनिष्ठ व अत्यंत विश्वासू मानले जाणारे शिंदे  यांचे काॅंग्रेसमधील राजकीय मातब्बरीचे युग संपणार की काय, अशी चर्चा सोलापुर जिल्ह्यात यामुळे रंगली आहे.

काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हे काल बदल केले. महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, राजीव सातव, रजनी पाटील यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. गेल्या महिन्यात काॅंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी मागणी करणाऱ्या अनेक नेत्यांना संघटनेच्या शीर्षस्थ जबाबदारी देण्यात आली नाही. शिंदे यांनी या विषयावर आपले कोणतेच मत व्यक्त केले नव्हते. तरी त्यांना कार्यकारिणीत जबाबदारी न दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. नंतर विस्तारीत कार्यकारिणीत विशेष किंवा कायम निमंत्रित म्हणून त्यांच्या नावाच विचार होईलही. पण हे पद म्हणजे केवळ बैठकीसाठी असते. प्रत्यक्ष अधिकार कमी असतात. त्यामुळेच शिंदे यांचे नाव कालच्या यादीत नसणे याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. 

सोलापूरमध्ये गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत शिंदे यांचा सलग पराभव झाला आहे. विशेष म्हणजे समोरील विजयी उमेदवारांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अनुक्रमे शरद बनसोडे ,जयसिध्देश्वर शिवाचार्य स्वामी यांनी मोठ्या मताधिक्याने शिंदे यांचा पराभव केला .याच वेळी शिंदे राजकीय प्रवाहाबाहेर फेकले जाणार की काय अशी कुजबुज नागरिकांमध्ये होत होती. २०१४ च्या लोकसभेच्या  पराभवानंतर शिंदे यांनी मी आत्ता कोणतीही निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केले होते. पण पक्षाच्या आदेशाने त्यांना २०१९ ची लोकसभा  निवडणूक लढवावी लागली आणि या निवडणुकीत जयसिध्देश्वर महाराजांनी केलेला पराभव शिंदे यांच्या जिव्हारी फारच लागला.

यानंतर शिंदे सार्वजनिक कार्यक्रमात फार तुरळक दिसू लागले. पक्षाची संघटना वाढविण्याच्या दृष्टिकोनातून फारसे प्रयत्नही केले नाहीत. ही बाब काँग्रेसचा राहुल गांधी यांच्या निदर्शनात आल्याची शक्यता आहे. त्यानंतरच शिंदे यांचे नाव मागे पडले असण्याची शक्यता आहे.

काॅंग्रेसला महाराष्ट्रात सध्या ओहोटी लागली आहे. खुद्द शिंदे यांच्या सोलापूर जिल्ह्यात या पक्षाच्या अस्तित्त्वाला घरघर लागली आहे. शिंदे यांच्या कन्या प्रणिता यांचाही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी विजय झाला. तेव्हाच शिंदे यांचा प्रभाव ओसरल्याची चर्चा सुरू झाली होती. आता काॅंग्रेस संघटनेने बेदखल केल्यानंतर या चर्चेवर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येते. अर्थात शिंदे यांचे गांधी कुुटुंबियांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे योग्य वेळी त्यांच्या नावाचा विचार झाला तरी आश्चर्य नाही, पण सध्या तरी शिंदेंना सक्तीची विश्रांती पक्षाने दिली आहे. 

सोलापुरात न्यायालयाबाहेरील पट्टेवाला ते देशाचा गृहमंत्री असा विस्मयकारक राजकीय प्रवास शिंदे यांनी केला. या प्रवासाला हा पूर्णविराम आहे की अर्धविराम हे आगामी काळच सांगेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com