पिंपरीः सोमाटणे या आणखी एका मोठ्या ग्रामपंचायतीचीही निवडणूक बिनविरोध झाली आहे. लाखोंचे बक्षीस मिळवणाऱ्या मावळ तालुक्यातील गावांची संख्या आता आठ झाली आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक करणाऱ्या गावाला मावळचे (जि.पुणे) आमदार सुनील शेळके यांनी जाहीर केलेले ११ लाख रुपयांचे बक्षीस आठ गावांनी पटकावले. मात्र, दोन गावांत एका जागेवर आणि दुसऱ्या दोन गावांत दोन जागांवर एकमत न झाल्याने या चार गावांचे हे बक्षीस हुकले.
अर्जमाघारीनंतर सात गावांचीच निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती काल मावळ तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली होती. मात्र, सोमाटणेचीही निवडणूक एकमताने झाली होती.पण,त्याची माहिती तेथील निव़डणूक अधिकाऱ्यानी उशीरा तहसीलदार कार्यालयाला कळवली. त्यामुळे तेथल बिनविरोध निवडीची अधिकृत माहिती उशीरा म्हणजे आज देण्यात आली.
सरकारी पातळीवर परस्पर औरंगाबादचे संभाजीनगर झाले अन् बाळासाहेब थोरात भडकले #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #Congress #BalasahebThorat #Aurangabad #SambhajiNagar #MVA #Viral #ViralNews @bb_thorat @INCMaharashtrahttps://t.co/oKYscqYyL9
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 6, 2021
मावळात ५७ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार होती. मात्र, गावचा एकोपा टिकून गावाचा विकास व्हावा, भावकीत भांडणे होऊ नये, या उद्देशाने स्थानिक आमदारांनी बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन करून ती करणाऱ्या गावाला ११ लाखाचे ईनाम जाहीर केले होते. त्याजोडीने विविध योजनांसाठी दहा लाख निधी असे एकूण २१ लाख रुपये मिळवण्याची घोषणा त्यांनी केली होती.
मात्र, एमआयडीसी, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आणि पर्यटनामुळे सुखवस्तू असलेला मावळ तालुका त्याला कितपत प्रतिसाद देईल याविषयी शंका होती. मात्र, ती खोटी ठरली. नवलाख उंबरे, येलघोळ,आंबेगाव,पाचाणे कुसगाव पमा, दारुंब्रे, आढे आणि सोमाटणमे या आठ गावांनी बिनिविरोध निवडणूक केली. त्यामुळे त्यांना आमदारांचे बक्षीस व निधीही मिळणार आहे. मात्र, मोरवे, माळवाडी या गावांचे हे बक्षीस थोडक्यात गेले. तेथे फक्त एकेका जागेवर एकमत झाले नाही. तर, खांडी आणि आपटी या दोन गावांत प्रत्येकी दोन जागांवर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे तेथे निवडणूक होणार असल्याने त्यांचे बक्षीस गेले. दरम्यान, आता ४९ गावांत निवडणूक होणार आहे.
माळवाडीत ११ पैकी १० जागांवर एकमत झाले. एका जागेसाठी तेथे दोघांत लढत होत आहे. मोरवेतही सातपैकी एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.आपटीत सातपैकी दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी चौघेजण रिंगणात आहेत. तर, खांडीत नऊपैकी सात सदस्यांची बिनविरोध निवड झाली. फक्त दोन जागांवर एकमत न झाल्याने तेथे सहाजण आखाड्यात आहेत.

