मराठा क्रांती मोर्चाच्या 'पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश दिंडी'मुळे  पंढरपुरात एसटी ठप्प... - Due to Maratha Kranti Morcha Pandharpur to Mantralaya Akrosh Dindi ST traffic closed in Pandharpur. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मराठा क्रांती मोर्चाच्या 'पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश दिंडी'मुळे  पंढरपुरात एसटी ठप्प...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश दिंडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या दोन दिवस पंढरपुरात येणारी आणि बाहेर जाणारी एसटीची प्रवाशी वाहतूक बंद ठेवली आहे. 

पंढरपूर : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश दिंडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या दोन दिवस पंढरपुरात येणारी आणि बाहेर जाणारी एसटीची प्रवाशी वाहतूक बंद ठेवली आहे. 

आज दिवसभरातील 1200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. दोन दिवसांमध्ये एसटीला  सुमारे 20 लाखाचा फटका बसला आहे, अशी माहिती येथील आगार प्रमुख ए. एस. सुतार यांनी दिली. 

या पार्श्वभूमीवर आज दुपारी पंढरपुरात जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या समवेत मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयकांची बैठक होणार आहे. बैठकीत कोणता तोडगा निघणार, याकडेच लक्ष लागले आहे. येथील आगारातून दिवसभरात सुमारे सहाशे गाड्या बाहेर जातात आणि तेवढ्याच बाहेरून येतात. याशिवाय राज्याबाहेरून एसटीची प्रवासी वाहतूक होते. 

आंदोलनामुळे येथील एसटीची सेवा ठप्प झाली आहे. यामध्ये एसटीला 20 लाख रुपयांचा फटका बसला आहे. आधीच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या एसटीला विविध आंदोलनांचा फटका सहन करावा लागत आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर प्रवासी वाहतूक बंद ठेवल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. रात्री 12 वाजले पासून संचार बंदी लागू केली आहे.
 

या मोर्चासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव पंढरपुरात दाखल होत असतानाच, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एसटीची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आजपासून पंढरपुरातून आंतरराज्य आणि आंतरजिल्हा होणारी प्रवासी वाहतूक दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शनिवारी पंढरपूर ते मंत्रालय असा दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे. 

पंढरपुरातून दिंडी मोर्चा काढण्याबाबत मराठा आंदोलक ठाम असून, अनेक मराठा कार्यकर्ते पंढरपुरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांची जादा कुमक बोलावण्यात आली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने आज (शुक्रवारी) मध्यरात्री 12 पासून उद्या शनिवारी (ता. 7) रात्री 12 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदीचा मराठा समाजबांधवांनी निषेध करत संचारबंदीच्या आदेशाची ठिकठिकाणी होळी केली आहे.

हेही वाचा :  भाजप आध्यात्मिक आघाडीचं तुळजाभवानी मंदिर परिसरात आंदोलन सुरू.. 

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्यातील मंदिर सुरु करावीत, या मागणीसाठी विविध संघटना, राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री 12 पासून ते पुढील 24 तास  तुळजापूर तुळजाभवानी मंदिर परिसरातील 300 मीटर परीघ परिसरात कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 
काल भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार मंदिर परिसरात घडू नये, यासाठी प्रशासनांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख