The dream seen at that time came true today: Girish Mahajan | Sarkarnama

त्या वेळी पाहिलेले स्वप्न आज साकार झाले : गिरीश महाजन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

रेल्वेत बसण्यासाठी जागा नसल्याने अक्षरशः काही जण कपलिंगमध्ये बसले होते. रेल्वेमध्ये एकच ‘जय श्रीराम’ हा नारा घुमत होता. 

जळगाव : "आम्ही अयोद्धेकडे कूच करण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र, पोलिसांनी आम्हाला अटक केली. ललितपुराच्या कारागृहात टाकले. दहा दिवसांनी आम्हाला सोडलं. मात्र, त्यावेळी राममंदिराचे जे स्वप्न आपण पाहिले होते. ते आज साकार होताना पाहताना आनंद होत आहे," असे मत माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेमुळे देशभरात रामानामाची चैतन्य लहर पसरली होती. ‘मंदीर वही बनाऐंगे’ ‘चलो अयोध्या’ असा नारा त्यावेळी घुमत होता. युवकही मोठया संख्येने भारावले होते. अयोध्येला जाण्यासाठी एक लहरच निर्माण झाली होती. मी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचा अध्यक्ष असल्याने आपल्या नेतृत्वाखाली अयोध्येत जाण्यासाठी जिल्ह्यातून एक हजार युवक रेल्वेने निघालो. रेल्वेत बसण्यासाठी जागा नसल्याने अक्षरशः काही जण कपलिंगमध्ये बसले होते. रेल्वेमध्ये एकच ‘जय श्रीराम’ हा नारा घुमत होता. 

गाडी जशजशी पुढे जात होती, तसतशी गाडीत गर्दी वाढत होती. मात्र कार्यकर्त्यांत जोरदार जोश आणि उत्साह होता. सर्व रेल्वेच ‘राममय’झाली होती. आम्ही जसजसे पुढे जात होतो. तसतश्‍या वेगवेगळ्या बातम्याही कानावर येत होत्या, अनेक ठिकाणी कारसेवकांना अडवून पोलिसांनी लाठीचार्ज केला, अनेकांना अटक करण्यात आली. अडवाणींची रथयात्रा रोखली अशा बातम्या कानावर येत होत्या.

त्या बातम्या गणिक रेल्वेतील कारसेवकांचा उत्साह मात्र, वाढतच होता. गाडी जशजशी अयोध्येकडे जात होती. तसतसे आमच्यात अधिकच उत्साह वाढत होते. त्याच वेळी एका ठिकाणी अचानक गाडी थांबली आणि अनेक कारसेवक उतरून पायीच चालू लागले. कोणते स्टेशन आहे. कोणते गाव आहे, हे कोणालाच कळत नव्हते. मात्र पुढे गाडी जाणार नाही, असे सांगितले जात होते. त्यामुळे अनेक कारसेवक पायीच ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत अयोध्येकडे निघाले होते. 

आम्ही कार्यकर्तेही मग गाडीतून उतरून घोषणा देत पायीच त्याच मार्गाने निघालो. त्यानंतर रस्त्यात अचानक घोषणाचा वेग वाढला आणि पळापळी सुरू झाली. काय होत आहे, कोणालाच कळत नव्हते. पोलिसांकडून कारसेवकांना अटक करण्यात येत असल्याचे कळाले, त्याच वेळी पोलिसांना चुकविण्यासाठी काही कारसेवक मधल्या मार्गाने आयोध्येकडे जात होते. यात आमच्या सोबत असलेले कार्यकर्तेही पांगले, पोलिसांना चुकवत आयोध्येकडे जाण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला.

आम्ही प्रयत्न करीत होतो. आम्हाला रस्ते माहित नव्हते मिळेल त्या रस्त्याने आम्ही घोषणा देत जात होते. त्यातच आम्हाला एका ठिकाणी पोलिसांनी गराडा घालून पकडले. आम्हाला पोलीस व्हॅनमध्ये टाकले, ज्यावेळी आम्हाला जेलच्या समोर उतरविण्यात आले. त्यावेळी आम्हाला कळले. ललितपूर कारागृहात आम्हाला आणण्यात आले आहे. मात्र, आमच्यातील काही जण निसटून अयोध्येकडे गेल्याचेही कळले. त्यामुळे मनाला आनंद वाटला. परंतु त्यांच चितांही वाटत होती. याच वेळी पोलिसांकडून होत असलेल्या मारहाणीचे वृत्तही येत होते. आम्ही ललीतपूर कारागृहात तब्बल दहा दिवस होतो, याच काळात अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारणीचे स्वप्नही बघत होतो. मात्र, ते आज पूर्ण झाल्याने मनाला आनंद होत आहे. त्यामुळे आजही मनापासून घोषणा बाहेर पडत आहे "जय श्रीराम"!
Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख