सरकार पाडण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा आपले १०५ राहतात का? याकडे लक्ष द्या.. - Do you live dreaming of overthrowing the government? | Politics Marathi News - Sarkarnama

सरकार पाडण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा आपले १०५ राहतात का? याकडे लक्ष द्या..

जगदीश पानसरे
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

सरकार पडणार, भाजपची सत्ता येणार अशी विधान दर दोन-चार दिवसांत केली जातात. मी त्यांना सांगू इच्छितो, की त्यांनी सरकार पाडण्याचे दिवास्वप्न पाहणे बंद करावे. हे सरकार पुढची चार वर्ष तर सत्तेवर राहीलच, पण त्यापुढे देखील आमचीच सत्ता कायम राहिल. सरकार पाडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा भाजपने आपले १०५ आमदार तरी पक्षात राहतील का? याकडे लक्ष द्यावे.

औरंगाबाद ः उठसूठ सरकार पडणार, दोन महिन्यात भाजपचे सरकार सत्तेवर येणार असे दिवास्वप्न पाहण्यापेक्षा भाजपने आपले १०५ आमदार तरी सोबत राहतात का? याकडे लक्ष द्यावे, असा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हा मध्यप्रदेश नाही, असा सूचक इशाराही दिला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून हे सरकार आज पडणार, उद्या पडणार असे भाकित भाजपच्या नेत्यांकडून वर्तवले जात आहे. यावर सरकारमधील मंत्री आणि तीन्ही पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी भाजपच्या या विधानाची खिल्ली देखील उडवली आहे. सध्या राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची धामधुम सुरू आहे. विशेषतः मराठवाड्यात राज्यातील भाजपचे नेते येऊन या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार पडणार, अशी विधानं आपल्या भाषणातून करतांना दिसत आहेत.

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी परभणी येथील पदवीधरांच्या मेळाव्यात बोलतांना केलेल्या अशाच एका विधानाचा समाचार घेतला. सत्तार म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे काम करते आहे. पण या सरकारला अपशकून करण्याचे काम विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सातत्याने होत आहे. 

सरकार पडणार, भाजपची सत्ता येणार अशी विधान दर दोन-चार दिवसांत केली जातात. मी त्यांना सांगू इच्छितो, की त्यांनी सरकार पाडण्याचे दिवास्वप्न पाहणे बंद करावे. हे सरकार पुढची चार वर्ष तर सत्तेवर राहीलच, पण त्यापुढे देखील आमचीच सत्ता कायम राहिल. सरकार पाडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा भाजपने आपले १०५ आमदार तरी पक्षात राहतील का? याकडे लक्ष द्यावे, कारण त्यांचेच आमदार सोबत राहतील की नाही, अशी शंका माझ्या मनामध्ये आहे.

हा महाराष्ट्र आहे, मध्यप्रदेश नाही हे देखील भाजपच्या नेत्यांनी  लक्षात ठेवावे. इथे शिवसेना आहे, आणि शिवसेना कसे प्रत्युत्तर देते हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही, `समझने वाले को इशारा काफी है`, असा इशारा देखी सत्तार यांनी यावेळी दिला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख