राज्यमंत्र्यांची पोलिस कर्मचाऱ्यासोबत 'तू-तू मै-मै'...

पोलिस कर्मचाऱ्याने मतदान केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगितल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा पारा चांगलाच चढला. तू आम्हाला सांगणारा कोण, असे विचारत तू विरोधकांचे पैसे खाललेस, असा आरोप त्यांनी केला. त्यावर पोलिसानेही मी पैसे खालले असतील तर माझी चौकशी करा, असे उत्तर दिले.
abdul sattar
abdul sattar

औरंगाबाद : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची एका पोलिस कर्मचाऱ्याशी किरकोळ कारणावरून तू-तू मै-मै झाल्याचा प्रकार रविवारी घडला. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 18 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार सतिश चव्हाण मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले होते. सत्तार आणि चव्हाण हे बराच वेळ मतदान केंद्रावर थांबले होते. त्यावेळी मतदान केंद्रावर तैनात असलेल्या क्रांती चौक पोलिस ठाण्याचे हवालदार संजय भोकरे यांनी मतदान केंद्रावर दीड-दोन तासांपासून बस्तान मांडून बसलेल्या सत्तार आणि चव्हाण यांना बाहेर जाण्याची विनंती केली.

मात्र, पोलिस कर्मचाऱ्याने बाहेर जाण्यास सांगितल्याने सत्तार यांचा चांगलाच पारा चढला. तू आम्हाला सांगणारा कोण, असे विचारत तू विरोधकांचे पैसे खाललेस, असा आरोप सत्तार यांनी केल्याचे सांगण्यात आले. त्यावर पोलिसानेही मी पैसे खालले असतील तर चौकशी करा, असे उत्तर दिले. त्यानंतर बराच वेळ मतदान केंद्राबाहेर चांगलाच गोंधळ उडाला होता. अखेर अनेकांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला. 

दरम्यान, सत्तार यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्याची मागणी केली. त्यासाठी सत्तार यांनी पोलिस उपनिरीक्षकाला चांगलेच धारेवर धरल्याचे वृत्त आहे. सत्तार यांनी मतदान केंद्रावर घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या मतदान केंद्राबाहेर एक पोलिस कर्मचारी आणि राज्यमंत्री यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे दिवसभर विविध चर्चांना मात्र ऊत आले होते. दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात आधीच अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारच्या त्रासात सत्तार यांच्या अशा वागणुकीमुळे भरच पडणार असून विरोधकांनाही मुद्दा सापडणार आहे.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com