ढिंग टांग  :  नाथाभाऊ म्हणतात.. "कळेल, कळेल..!"

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अनेक तर्क-वितर्क व्यक्त केलं जात आहे. याबाबत..
31Maha_Eknath_Khadse_not_keen.jpg
31Maha_Eknath_Khadse_not_keen.jpg

राजकारण हा असा एक पत्त्यांचा खेळ आहे की आपल्या छातीजवळील पान बदामचे आहे की इस्पिकचे हेदेखील शेजारच्याला कळू न देता उतारी करावी लागते. किंबहुना आपल्याकडे चौकट गुलाम असेल तर तोच एक्का असल्याचा भाव चेहऱ्यावर राखावा लागतो. स्पर्धकाच्या चेहऱ्यावरील भाव हाच खरा हुकमाचा पत्ता असतो.

पण हल्ली मास्कमुळे हा खेळ भलताच अवघड  होऊन बसला आहे. हल्ली चेहऱ्यावरले भाव सोडा, आख्खाच्या आख्खा माणूस ओळखणे कठीण झाले आहे. माणूस ओळखला तरी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा अंदाज लागत नाही. कारण तो शिंचा मास्क!! मास्कच्या आडून एखादे माणूस ‘हो’ म्हणाले की ‘नाही’ हेसुद्धा अनेकदा कळत नाही. अशा परिस्थितीत राजकीय आडाखे कसे बांधावेत आणि आपली उतारी करावी कशी?

रा. नाथाभाऊंना हाच प्रश्न छळत असणार, हे आमच्यातील सजग राजकीय पत्रकाराने ताडले. रा. नाथाभाऊ यांच्याबद्दल आमच्या मनीं पहिल्यापासून कमालीचा जिव्हाळा आहे, हे आधी मान्य करावे लागेल. परवा असेच झाले...

रा. नाथाभाऊ यांच्या मनात नेमके काय चालले आहे, (पक्षी : छातीशी पत्ते कुठले आहेत?) याची टोटल लागता लागत नव्हती. रा. नाथाभाऊंनी काय ठरवले आहे? जावे की न जावे? उतारी करावी की न करावी? याची उकल होणे, महाराष्ट्रासाठी अतिआवश्‍यक  होते.

एरवीचे दिवस असते तर थेट मुक्ताईनगरला जाऊन विचारले असते. सध्या लॉकडाऊनमुळे प्रॉब्लेम झाले आहेत, हे सारे जाणतातच. पण मा. नाथाभाऊ स्वत:च मुंबईत आल्याचे कळले, म्हणून आम्ही त्यांना तेथेच गाठले.

...त्यांच्या तोंडाला मास्क होता, तरीही त्यांना आम्ही वळखले. नाथाभाऊंनी अगदी ‘पीपीई’ किट घातले तरी त्यांना दुरुनही कोणीही ओळखेल!! आम्ही समोर येताक्षणी त्यांनी माश्‍या वारल्यासारखे हात केले. आमचा गैरसमज झाला. आम्ही त्यांना मच्छर मारण्याची रॅकेट नेऊन दिली! त्यांनी ती बाजूला फेकली आणि संतापून ओरडले, ‘बाहेर व्हा! कशाला आले तुम्ही हितं?’ 
 
‘‘शतप्रतिशत प्रणाम!’’ नम्रता हा आमचा विशेष गुण आहे. रा. नाथाभाऊंनी आपल्याला नीट ओळखावे म्हणून आम्ही कानास अडकवलेला मास्कबंद काढून मुखचंद्र दाखविला, आणि पुन्हा बंद कानांस अडकविला.

‘‘तुमचे अडवान्समध्ये अभिनंदन करावयास आलो होतो!’’ आम्ही.

‘काह्याले अभिनंदन करता बा? काय घडून गेलं तं असं?’, त्यांनी आम्हाला अक्षरश: उडवून लावले. छातीजवळ धरलेले अदृश्‍य पत्ते त्यांनी आणखी छपवले.

‘‘तुम्ही कमळाबाईची साथसंगत सोडताय, असं कळलं..!,’’ आम्ही प्रामाणिकपणाने खरे काय ते सांगून टाकले.

‘कळेल, कळेल!’ काही काळ शांतता राखून मग मास्कआडून ते म्हणाले.

‘‘तुम्ही नव्या सरकारात शेतकी मंत्री होणार, असे म्हंटात! खरं का?’’ आम्ही.

‘‘कळेल, कळेल!’’ मास्कआडून (पुन्हा) ते म्हणाले.

 ‘‘ घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही सीमोल्लंघन करणार, असं म्हंटात! खरं का?,’’ आम्ही कधीही चिकाटी सोडत नाही. शेवटी पत्रकारिता कशाशी खातात? असो.

‘‘कळेल, कळेल!’’ त्यांनी ताकास तूर लागू दिली नाही. छातीला चिकटवलेला आपला पत्ता उघड करण्यास ते राजी नव्हते, हे उघड होते. 

‘‘ पण मग निर्णय नक्की ना? की आपली नेहमीसारखी हूल?’’,असे आम्ही विचारणार होतो, पण गप्प बसलो. आश्‍चर्य म्हणजे तरीही अचानक ते म्हणाले, ‘‘कळेल... तेही कळेल!’’


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com