काँग्रेसचे करेक्ट वर्णन यापेक्षा दुसरं असूच शकत नाही : पवारांच्या विधानावर फडणवीसांचे भाष्य

पूर्व पुण्याईवर आपण जास्त दिवस जगू शकत नाही.
काँग्रेसचे करेक्ट वर्णन यापेक्षा दुसरं असूच शकत नाही : पवारांच्या विधानावर फडणवीसांचे भाष्य
Correct description of the Congress cannot be any other than this

मुंबई : ‘‘काँग्रेस पक्षाचे करेक्ट वर्णन यापेक्षा दुसरं असूच शकत नाही. कारण, काँग्रेस ही आता जुन्या पुण्याईवर जगते आहे. आमच्या वऱ्हाडामध्ये असे म्हटले जाते की, मालगुजारी तरी गेली, आता उरलेल्या मालावर गुजराण चालली आहे. अशाच प्रकारचे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. जे काँग्रेसला चपखल लागू आहे, त्यांना आरसा दाखवण्याचे काम पवार यांनी केले आहे,’’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्या काँग्रेसशी संबंधित वक्तव्यावर दिली. (Correct description of the Congress cannot be any other than this)

फडणवीस यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. त्यावेळी फडणवीस यांना पवार यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या वक्तव्यावर विचारले असता, त्यांनी वरील उत्तर दिले. 

देशात एकाच कुटुंबाची सत्ता असावी, असे मानणारी काँग्रेस ही पार्टी आहे. त्यांना आरसा दाखवण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. देशात लोकशाही आहे, आपली वतनदारी आता संपली आहे. पूर्व पुण्याईवर आपण जास्त दिवस जगू शकत नाही. जनतेत जाऊन काम करावे लागेल. अशा प्रकारचा संदेश पवार यांनी काँग्रेसला दिला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘ईडीची पिडा टळू दे आणि आमच्या मागे जे ईडी लावताहेत, त्यांच्या मागे पिडा लागू दे,’ असे म्हटले आहे. त्यावर आपले मत काय, असे विचारल्यावर ते म्हणाले की, ‘‘जयंतरावांना माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांच्या मागे कुठलीही पिडा लागू नये. त्यांच्याच काय कोणच्याच मागे पिडा लागू नये. कुणाच्याच मागे काही लागू नये, असे मानणारे आपण आहोत. त्यामुळे ईडीची पिडा मागे लागेल, असे कोणीच वर्तन करू नये, अशी ईश्वराला प्रार्थना करतो.

महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ‘सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही हो सकता,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर फडणवीस म्हणाले की, याचे उत्तर काळच देऊ शकतो. आताच या संदर्भातील निर्णय आला आहे, तो काय आहे, हे मी अजून वाचला नाही. हा एका प्रकरणाचा निकाल आहे. पण, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मी काही त्यांचे वाईट व्हावे, ह्या हेतूचा नाही. पण, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य नाही.

काय म्हणाले  होते पवार ?

रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी काँग्रेसची आजची स्थिती झाली आहे. याविषयी बोलताना शरद पवार यांनी उत्तर प्रदेशातील जमीनदारांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, एका जमीनदाराकडं हजारो एकर शेती, गावात हवेली असते. पण लँड सिलिंगचा कायदा आला अन् जमीन गेली. हवेली तशीच राहिली तरी त्याची दुरूस्ती करण्याची ताकद त्याच्यात नाही. हजारो एकर जमिनीपैकी आता केवळ 15-20 एकर जमीन उरली आहे. हा जमीनदार सकाळी उठून हवेलीतून बाहेर येत म्हणतो की, ही आजूबाजूला असलेली हिरवीगार शेती माझी होती. तो माझं होतं असं म्हणतो. पण आता ते नाही, असं सांगत पवार यांनी काँग्रेची अवस्था याच जमीनदारासारखी झाल्याचं सुचक विधान केलं. पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेस होती. पण ती होती, आता नाही. हे पक्षानं मान्य करायला हवं. ही मानसिकता बदली तर इतर जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल, असंही पवार यांनी स्पष्ट केले होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in