अजित पवार लस कधी घेणार ?  - Corona Vaccination When will Ajit Pawar get vaccinated | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवार लस कधी घेणार ? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

लसीकरण कमी होत असल्याचं निदर्शनास आल्याचं अजित पवार यांनी सांगितले.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाबाबत आज आढावा घेतला. लसीकरण कमी होत असल्याचं निदर्शनास आल्याचं पवार यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले, "का लसीकरण कमी होतं आहे, कळत नाही, मात्र अनेक कर्मचारी लस घेण्यास धजावत नाही. कोविन अँपमुळेही गोंधळ निर्माण झाला आहे. कारण देशस्तरावर काम करणार ते अँप आहे, त्यामुळे लसीकरण वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात फारचं कमी लसीकरण झाले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात लसीकरण कमी आहे, त्यामुळे लसीकरण वाढवावं लागणार आहे, शहरातील इतर हॉस्पिटल्सनी लसीकरणाची परवानगी मागितली आहे, ती देण्याच्या संदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपूरावा करीत आहेत. 

अजित पवारांना तुम्ही लस कधी घेणार हा प्रश्न विचारल्यावर दादा म्हणाले की आधी कोरोना वॉरियर्स आणि डॉक्टर, मेडीकल स्टाफला लस देण्याचं नियोजन आहे, आम्ही यात येत नाही, ज्या दिवशी आम्हाला सांगितलं जाईल की लस घ्या त्या दिवशी आम्ही लस घेऊ, असं सांगत लोकप्रतिनिधी कधी लस घेणार या प्रश्नाला दादांनी मिश्कीलपणे उत्तर दिलंय. चक्कर येण्यासारखे किरकोळ अपवाद वगळता कोरोना लसीकरणाची सुरवात पुणे जिल्ह्यात झाली. पण काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याबाबत तूर्त वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतल्याने  कोरोना लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यात प्रशासनाला अपयश आले. पिंपरीमध्ये पहिल्या दिवशी ५७ टक्के लसीकरण झाले. २४ जणांनी लस टोचून घेण्यास चक्क नकार दिला होता.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये २९८, पुण्यात ३३०,तर उर्वरित पुणे जिल्ह्यात ५२२ अशा एकूण ११५० जणांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ती प्रत्येकी आठशे,तर उर्वरित जिल्ह्यात ती दीड हजार जणांना पहिल्या दिवशी दिली जाणार होती. मात्र, जिल्ह्यात ३१०० पैकी १८०२ जणांना ती देण्यात यश आले.लसीकरणासाठी आलेल्यांपैकी ७१ जणांनी ती घेण्यास नकार दिला.तर नऊजण हे अल्पवयीन आढळल्याने त्यांना ती दिली गेली नाही.त्यातील आठ पिंपरी-चिंचवडमधील आहेत. याचाच अर्थ हे नऊ अल्पवयीन हे वैद्यकीय कर्मचारी आहेत,हे विशेष.अल्पवयीनांच्या जोडीने गरोदर महिला व इतर आजार असलेल्या व लस घेण्यास आलेल्या जिल्ह्यातील ७७ जणांनाही ती टोचण्यात आली नाही.त्यातील २२ जण हे उद्योगनगरीतील आहेत..

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्यात ती वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत दिली जात आहे. पहिल्या दिवशी पुण्यापेक्षा (५५)पिंपरी-चिंचवडमध्ये दोन टक्के जास्त (५७)लसीकरण झाले.तर, लस नाकारण्यात,मात्र पुणे हे उद्योगनगरीच नव्हे,तर जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागापेक्षाही आघाडीवर राहिले. ही दोन्ही शहरे वगळता पुणे जिल्ह्याने ६१ टक्के लसीकरण करीत पुणे जिल्ह्याने शिक्षणनगरी आणि उद्योगनगरीवर आघाडी घेतली. 

दुसरीकडे या दोन्ही शिक्षित शहरांच्या तुलनेत कमी शिक्षित असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बाकीच्या ग्रामीण भागात लस नाकारण्याची संख्या लसीकरण दुप्पट असूनही अवघी १५ निघाली.तर, पिंपरी-चिंचवडमध्ये २४ आणि पुण्यात ३२ जणांनी ती घेण्यास नकार दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये ८०० पैकी ४५६,तर पुण्यात ८०० पैकी ४३८ जणांना ही लस देण्यात आली.

उर्वरित पुणे जिल्ह्यात १५०० पैकी ९०८ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ती टोचण्यात आली. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये  प्रत्येकी आठ,तर जिल्ह्यात यासाठी १५ केंद्रे सुरु करण्यात आलेली आहेत. राज्यातील २८५ केंद्रावर पहिल्या दिवशी १८,३३८ जणांनी ही लस दिली गेली. ही टक्केवारी ६४ टक्के असून ती पुणे,पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यापेक्षाही अधिक आहे.सिंबायोसिस मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटलने मात्र आपला शंभरजणांचा कोटा पूर्ण करीत शंभर टक्के लसीकरण केले.

पुणे ग्रामीणमधील केंद्राचे हे यश पिंपरी-चिंचवड व पुण्यातील एकाही केंद्राला साध्य करता आले नाही.सर्वात कमी लसीकरण कान्हेफाटा,ता.मावळ (३३) आणि कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे (३४) येथे झाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख