मतदारांच्या सोयीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुसले बाकडे - For the convenience of voters, the District Collector cleared the benches | Politics Marathi News - Sarkarnama

मतदारांच्या सोयीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुसले बाकडे

विकास गाढवे
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

श्रीकांत यांनी स्वतः पुढे येऊन शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेले बेंच बाहेर काढण्यास सुरवात केली. बेंचवरील धुळही त्यांनी कपड्याने पुसली. श्रीकांत स्वतः शिपायाचे काम करत असल्याचे पाहून मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी झाली. सर्वांनीच मग बेंच काढून पुसण्याचे काम केले. शिपाई कर्मचारीही धावून आले.

लातूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी (ता. एक) येथील केशवराज विद्यालयातील केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी प्रचंड उत्साह दाखवत रांगा लावल्या. यात सोशल डिस्टन्शींगमुळे रांगेची लांबी वाढून मतदान केंद्राच्या बाहेर गेली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी मतदानासाठी केंद्राला भेट दिल्यानंतर अनेक ज्येष्ठ मतदार रांगेत ताटकळल्याचे त्यांना दिसले. या मतदारांना तातडीने बसण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देत त्यांनी स्वतः बाकड्यांवरची धुळ पुसत मतदारांना बसून घेण्याचे आवाहन केले.

मतदारांच्या रांगा वाढल्या्मुळे अनेकजण उन्हात उभे असल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी बसण्यासाठी बाकडे टाकण्याच्या सूचना बीएलओंना केल्या. पण शिपाई नसल्याचे कारण पुढे करत त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेत मतदारांना बसण्यासाठी बाकडे (बेंच) टाकले व त्यावरील धुळही पुसली. यामुळे मतदान केंद्रावरील धावपळ उडाली. काही क्षणात मतदारांना बसण्याची व्यवस्था झाली व ताटकळलेल्या मतदारांना दिलासा मिळाला.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी सकाळी आठपासून मतदानाला सुरवात झाली. केशवराज माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीत तीन मतदान केंद्र असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी तोबा गर्दी करत रांगा लावल्या. याच केंद्रावर जिल्हाधिकारी श्रीकांत यांचेही मतदान होते.

सकाळी साडेदहा वाजता ते मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांना मतदारांची गर्दी दिसली. कोरोनामुळे मतदानासाठी केलेल्या फिजिकल डिस्टन्शींगच्या नियमांमुळे मतदारांच्या दूर अंतरावर रांगा लागल्या होत्या. एका केंद्राची रांग तर केंद्राबाहेर आली. रांगेत अनेक मतदार साठ वर्षापुढील होते. हे पाहून श्रीकांत यांनी केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला (बीएलओ) पाचारण केले. त्याला रांगेतील मतदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

मात्र, बीएलओ कर्मचाऱ्याने त्यासाठी शिपाई कर्मचारी नसल्याची सबब पुढे केली. त्यानंतर श्रीकांत यांनी स्वतः पुढे येऊन शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेले बेंच बाहेर काढण्यास सुरवात केली. बेंचवरील धुळही त्यांनी कपड्याने पुसली. श्रीकांत स्वतः शिपायाचे काम करत असल्याचे पाहून मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी झाली. सर्वांनीच मग बेंच काढून पुसण्याचे काम केले. शिपाई कर्मचारीही धावून आले. काही क्षणातच मतदारांना चकाचक बेंचची व्यवस्था झाली व तासाभरापासून ताटकळलेले मतदार बेंचवर विसावले. 

केंद्रातील मतदान प्रक्रिया मंद गतीने सुरू होती. ही परिस्थिती पाहून केंद्राध्यक्षांनी अतिरिक्त साहित्य व जादा मनुष्यबळाची मागणी केली नसल्याचे श्रीकांत यांच्या लक्षात आले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनीही लक्ष दिले नव्हते. मतदार व कर्मचाऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करूनही त्याची माहिती कोणालाच नव्हती. यामुळे श्रीकांत चांगलेच संतप्त झाले. त्यांनी सर्वांची चांगलीच हजेरी घेतली. मतदान केंद्रात स्वतः जाऊन प्रक्रियेला वेग दिला. यामुळे रांगेतील मतदारांची संख्या वेगाने कमी होऊ लागली.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख