काॅंग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी उडविली प्रदेशाध्यक्षपदासाठीच्या इच्छुकांची झोप - congress will elect pradesh president by digitaly voting | Politics Marathi News - Sarkarnama

काॅंग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी उडविली प्रदेशाध्यक्षपदासाठीच्या इच्छुकांची झोप

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

नव्या प्रदेशाध्यक्षाच्या शोधासाठी सहमती बनविण्याचे प्रयत्न 

पुणे : काॅंग्रेस संघटनेत आता नेत्यांची, कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन नियुक्त्या करण्याचा नवा प्रयोग सुरू झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी डिजिटली मतदान घेण्याचे किंवा फोनवरून आपल्या पसंतीची तीन नावे कळविण्यासाठीच यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरून बाळासाहेब थोरात हे जाणार असल्याचे निश्चित असून नवा प्रदेशाध्यक्ष नेते आणि कार्यकर्त्यांची मते घेऊन निवडला जाणार असल्याचे दिसून येत आहे.

काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी या संदर्भात मुंबईत गेल्या  दोन दिवसांत नेत्यांची, आमदारांची मते जाणून घेतली. याशिवाय इतरही प्रमुख कार्यकर्त्यांकडून अपेक्षित नावे मागविण्यात आली आहेत. 

एच. के. पाटील यांच्या आवाजात सर्व नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे. काँग्रेसच्या शक्ती ॲप द्वारे हे डिजिटल मतदान घेतलं जात आहे. महाराष्ट्रात 557 प्रदेश प्रतिनिधी आहेत. प्रत्येकाला पसंतीक्रमानुसार मत नोंदवायला सांगितले आहे.

काँग्रेसचे मागचे दोनही प्रदेशाध्यक्ष मराठा समाजातले आहेत. नुकतेच मुंबई काँग्रेस अध्यक्ष नेमले गेलेले भाई जगताप हेही मराठाच आहे. नवा प्रदेशाध्यक्षही मराठाच नेमला तर विधीमंडळ नेता, मुंबई अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशी तीनही पदांवर मराठा होईल. त्यामुळेच बदल करायचाच असेल तर जातीय संतुलनात मग बिगर मराठा चेहरा देण्याची गरज आहे, यावर चर्चा सुरू आहेत. त्यामुळे विधानसभेचे सभापती नाना पटोले, खासदार राजीव सातव यांचे नाव घेतले जात आहे. निष्ठावंत पण तरुण नेत्यांमध्ये अमित देशमुख, संग्राम थोपटे, यशोमती ठाकूर या नावांचीही चर्चा आहे. विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाच पुढे कायम ठेवा, असेही काही आमदारांनी सुचविले. पण थोरात हे तीन पदांवर असल्याने विदर्भातून प्रदेशाध्यक्ष द्यावा किंवा तरुण चेहऱ्यांना येथे संधी द्यावी, यावर चर्चा सुरू आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख