"रामाच्या नावाने चंदा, हाच भाजपाचा धंदा.." सावंतांचा आरोप..

भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
Sachin Sawant29f.jpg
Sachin Sawant29f.jpg

मुंबई  : राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टलाच आपला निधी पोहचेल याची जनतेने काळजी घ्यावी, महाराष्ट्राच्या जनतेची लुबाडणूक होऊ नये याची राज्य सरकारने दक्षता घ्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सचिन सावंत म्हणाले, "अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे, परंतु या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएस देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता आहे. हा पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा भाजपाच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने राम मंदिर निर्मितीसाठीच आपला निधी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये थेट जाईल, याची खबरदारी घ्यावी. आजवर भाजपा-आरएसएस मार्फत गोळा केलेला निधी हा ट्रस्टलाच भाजपा-आरएसएसने पोहोचवला की नाही याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी करून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आहे." 

सावंत म्हणाले की, भाजपा व संघ परिवाराने राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे अद्याप काय झाले याची माहिती त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने २०१५ मध्ये विश्व हिंदू परिषदे तर्फे १४०० कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपही केला होता. त्याचेही उत्तर अजून संघ परिवारातर्फे दिले गेलेले नाही किंवा याची चौकशी करण्याची तयारी भाजपाच्या कोणत्याही सरकारने दाखवलेली नाही. यासंदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाला ४ ऑगस्ट २०१७ रोजी तक्रार केली होती.

४ जानेवारी २०२१ रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपातर्फे राम मंदिर निर्मितीकरता निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाचा विरोध केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपाला अयोध्येत राम मंदिर कधीच नको होते आणि भाजपाकरीता हा केवळ राजकीय आणि पैसे कमावण्याचा कार्यक्रम आहे. 

गेल्या तीन दशकामध्ये भाजपाने जमा केलेल्या पैशाचा अजूनही हिशोब दिलेला नाही, असे हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी सांगितले आहे. राम मंदिरासाठी भाजपारुपी रावण पैसे गोळा करत आहे, असे म्हणून जर हे निधी संकलन जनतेमध्ये जाहीर केले नाही तर कोर्टात जाऊ, असा इशाराही प्रमोद पंडीत जोशी यांनी दिला आहे. 
या निधी संकलनादरम्यान अपहाराच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत, त्या चिंताजनक आहेत. १० सप्टेंबर २०२० रोजी राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टमधून ६ लाख रुपये क्लोन चेकच्या माध्यमातून काढले गेले होते. १२ एप्रिल २०२० रोजी दिल्लीच्या एका युवकावर अयोध्येतील राम मंदिर पोलिस स्टेशनमध्ये खोट्या ट्रस्टच्या नावाने खोटी वेबसाईट काढून पैसे लुबाडल्याची देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे सावंत यांनी सांगितले.  

श्रीराम मंदिर निर्माण समर्पण निधी समितीचे मुरादाबाद येथील अध्यक्षांनी खोट्या पावत्या दाखवून राम मंदिराकरिता निधी गोळा करणाऱ्या ४ लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे. पिलीभित येथे देखील ५ लोकांवर अशाच तऱ्हेने खोट्या संघटनेच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचा धंदा उघड झाला आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी देखील दिल्ली येथे राम मंदिर ट्रस्टच्या नावाने खोटे ट्विटर, वेबसाईट बनवल्याची तक्रार केली आहे.
आरएसएससंबंधीत ऑप-इंडिया या न्यूज पोर्टलने राम जन्मभूमी तिर्थक्षेत्रच्या नावाने गैरव्यवहार केला जात आहे. अपहार करणाऱ्या १३ UPI ( United payment Interface) ची यादीच दिली असून त्यामाध्यमातून आपल्याशी गैरव्यवहार होऊ शकतो, असा इशारा देऊन काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सूरत पोलिसांनी देखील अशाच प्रकारची कारवाई १६ जानेवारीला करून एका युवकाला पैसे गोळा करताना पकडले आहे.  

या पार्श्वभमीवर महाराष्ट्रात भाजपा आणि आरएसएस कडून मोठ्या प्रमाणात रोखीने पैसे गोळा केले जात आहे. यातून भगवान श्रीराम भाविकांची लुट होण्याची मोठी शक्यता आहे. या अनुषंगाने सदर पैसा राम मंदिराच्या निर्माण करताच निर्मीत झालेल्या ट्रस्टमध्ये जाईल याची जनतेने काळजी घ्यावी असे आवाहन सदर ट्रस्टतर्फेही करण्यात आलेले आहे.त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनतेला लुबाडण्यात येऊ नये या कारणाने भाजपा आरएसएसने गोळा केलेला निधी त्याच ट्रस्टमध्ये पोहोचला की नाही याची राज्य सरकारने चौकशी करावी अशी मागणीही सावंत यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com