गुंठेवारीसाठी शिवसेनेकडून गोंधळ ; भाजपचा आरोप - Confusion from Shiv Sena for Gunthewari  BJP's allegation  | Politics Marathi News - Sarkarnama

गुंठेवारीसाठी शिवसेनेकडून गोंधळ ; भाजपचा आरोप

मनोज भिवगडे 
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

गुंठेवारीसाठी शिवसेनेने गोंधळ घातल्याचा आरोप भाजपने केला आहे.  

अकोला : महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा एकदा वादळी ठरली. मागील सभेच्या नावाखाली मंजूर करण्यात आलेल्या विषयांची सभेत माहिती देण्याच्या मागणीवरून शिवसेना गट नेते राजेश मिश्रा व सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर शिवसेनेसह विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे सदस्य महापौरांपुढे एकत्र झाले. त्यातून सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी घोषणा बाजी सुरू झाली. या गोंधळातच महापौर अर्चनाताई मसने यांनी विषय सूचीवरील सर्व विषय मंजूर झाल्याचे जाहीर करीत राष्ट्रगीताला सुरुवात केली. 

विषय पत्रिकेवर गुंठेवारीच्या प्रकरणाची चौकशी करण्याचा विषय होता. त्यात शिवसेनेचे लोक अडकणार असल्याच्या भितीने शिवसेना गटनेते व नगरसेवकांनी गोंधळ घालून त्यांच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांनी केला. गुंठेवारीसाठी शिवसेनेने गोंधळ घातल्याचा आरोप भाजपने केला आहे.  

शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी बहुमताच्या जोरावर भाजप कोणतेही विषय मंजूर करून घेत आहे. ज्याची सभागृहात चर्चा झाली नाही, विषय पत्रिकेवर विषय नव्हते तेही वेळेवरचे विषय दाखवून मंजूर केले आहे. त्याची माहिती सभागृहात देण्याचे टाळण्यासाठी व आपला हित साध्य करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी ही सभा गुंडाळल्याचा आरोप केला. विरोधपक्ष नेते साजिद खान पठाण यांनी सत्ताधारी भाजप व शिवसेना यांची मिलिभगत असून, सर्वसामान्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष करीत सभेत गोंधळ घालून आपल्या हिताचे विषय मंजूर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भाजप व शिवसेनेवर केला आहे. 

वंचित बहुजन घाडीच्या गटनेत्या अॅड. धनश्री देव यांनी सत्‍ताधारी व शिवसेनेकडून इतर सदस्यांच्या हक्कावर गदा आणली जात असल्याचा आरोप केला. महिला नगरसेवकांना त्यांचे प्रश्न मांडण्याचा व महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यापासून वंचित ठेवण्यासाठी भाजप व शिवसेनेचे काही नगरसेवक हातमिळवणी करून काम करीत असल्याचा आरोप केला.

सलग तिसऱ्या सभेत गोंधळ
महानगरपालिकेच्या सलग तिसऱ्या सभेत वादळी चर्चा व नगरसेवकांचा गोंधळ बघावयास मिळाला. यापूर्वी २ जुलै व ३१ जुलैच्या सभेतही विरोधी पक्षांकडून सभेत गदारोळ घालण्यात आला होता. या गदारोळात सत्ताधारी भाजपकडून अनेक विषय मंजूर करून घेतले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख