भर रस्त्यात महिलेच्या शिव्या खाणाऱ्या पोलिसाचा आयुक्तांकडून सत्कार..   - Commissioner felicitates a policeman who was beaten by a woman for restraint..Ten thousand rupees, certificate | Politics Marathi News - Sarkarnama

भर रस्त्यात महिलेच्या शिव्या खाणाऱ्या पोलिसाचा आयुक्तांकडून सत्कार..  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

पारठे यांच्या या कामगिरीबाबत मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी कैातुक केले आहे. त्यांना दहा हजार रूपये, प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे.  

मुंबई : काळबादेवी परिसरात कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे एका महिलेने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात पोलीस हवालदार एकनाथ श्रीरंग पारठे यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यांनी या घटनेत संयम बाळगला आणि परिस्थिती आटोक्यात आणली होती. पारठे यांच्या या कामगिरीबाबत मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी कैातुक केले आहे. त्यांना दहा हजार रूपये, प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे.  

काळबादेवी परिसरात कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे एका महिलेने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार तीन दिवसापूर्वी समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे पोलिसांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. पोलिसांवर अशा प्रकारे हात टाकणाऱ्यांवर समाजानेच बहिष्कार टाकायला हवा, अशी भूमिका राऊत यांनी घेतली होती.   

पोलिसांनी या प्रकरणी सादविका रमाकांत तिवारी (वय 30, रा. मशीद बंदर) आणि मोहसीन निजामउददीन खान (26, रा. भेंडी बाजार) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे वाहतूक पोलिस हवालदार एकनाथ पारठे हे कर्तव्य बजावत असताना सादविका या महिलेसोबत एक व्यक्ती होता. त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे या महिलेने वाद करून वाहतूक हवालदार पारठे यांना मारहाण केली. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिला ही वाहतूक पोलिसाने शिवी दिल्याचा दावा करत आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलेने रस्त्यावर लोकांना जमवून वाहतूक पोलिसांला मारहाण केली. पोलिसांनी या आरोपांचे खंडन केले आहे. महिलेला कोणत्याही प्रकारची शिवी दिली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पारठे यांना मारहाण व शिवीगाळ होत असताना त्यांनी दाखवलेल्या संयमाचे सहपोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी कौतुक केले. 

संजय राऊत म्हणाले की, पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या आरोपींना तुरुंगात पाठवण्याआधी त्या ठिकाणी जे बघे होते त्यांनी थंड बसता कामा नये. आपल्यासाठी हुतात्मा होणाऱ्या पोलिसांवर कोणी तरी ऐरेगैरे हात टाकतात, कोणी तरी नटी उठते आणि त्यांना माफिया म्हणते आणि आपण सर्वजण सहन करतो. आज त्यांच्यावर जरी कारवाई झाली असली तरी समाजाने अशा लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे

या  प्रकरणातील आरोपींची नावे विशिष्ट जाती आणि धर्माची नाहीत. सरकारने आजच्या प्रकरणात ताबडतोब अर्ध्या तासात कारवाई केली आहे. डॉक्टरांवर हल्ले झाले तर कायदा केला जातो आणि पोलिसांवर हल्ला होतो तेव्हा आपण थंडपणे पाहतो, असे राऊत यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. ते म्हणाले होते की, पोलिसांवर हात उचलणे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणे याला सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करायला हवी. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख