आता रडकथा थांबवा; पूर्वीची धग दिसली पाहिजे! : सीमावादावर ठाकरे आक्रमक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. सीमावादाचा प्रश्न न्यायालयात आहे. तरीही कर्नाटक सरकारने बेळगावचे नाव बदलले. हा सरकारचा उर्मटपणा आहे, असा घणाघात ठाकरे यांनी केला..
CM Uddhav thakrey slams karnatak government over belgaon issue
CM Uddhav thakrey slams karnatak government over belgaon issue

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. सीमावादाचा प्रश्न न्यायालयात आहे. तरीही कर्नाटक सरकारने बेळगावचे नाव बदलले. हा सरकारचा उर्मटपणा आहे. हे प्रकरण न्यायालयात असेपर्यंत वादग्रस्त भूभाग केंद्रशासित का केला जात नाही? असे म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वादग्रस्त भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी केली. तसेच आता रडकथा थांबवून पूर्वीची धग दिसली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

'महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते. 

सीमाभागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या कानडी अत्याचाराचा आम्ही विरोध करत राहणार आहे. कर्नाटक सरकारल बेलगाम वागत आहे. आता सीमाभाग परत मिळविणारच आहे. यावर राज्यातील सर्व पक्ष एकत्रित आहेत. एकीकरण समितीतील एकजूट तुटली कशी? असा सवाल उपस्थित करून त्यांनी मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  

मराठी माणसाला दुहीचा शाप लागला आहे. प्रत्येकाने वेगळी चूल टाकली तर कर्नाटक सरकार त्यावर पोळ्या भाजते, हे लक्षात घेऊन पावले टाकायला हवीत. मराठी ताकद एकत्रित दिसल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. महाजन कमिशनचा अहवाल कसा बोगस आहे, याची अंतुले यांनी चिरफाड केली आहे. इंदिरा गांधी यांनी सांगितला होता तसा आता कालबद्ध कार्यक्रम आता आपल्याला करावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमुद केले. 

आता रडकथा नको...

सीमावादावरील पुस्तक म्हणजे रडकथा नको असे .सांगत मुख्यमंत्री म्हणाले, पुढची पावले जिंकण्याच्या दृष्टीने पडली पाहिजेत. याच विषयांसाठी बाळासाहेब तीन महिने तुरूंगात होते. मला ती संध्याकाळ आठवते. माहीम चर्च परिसर शिवसैनिकांनी फुलून गेला होता. मोरारजी देसाई यांचा ताफा न थांबता निघून गेला. तिथूनच सुरूवात झाली. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले की, माझी बॅग भरा कारण आता आम्हाला उचलतील आणि तेच घडले. त्यावेळी मुंबई दहा दिवस धगधगत होती. तीच धग आता पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

काही दिवसांपूर्वीच बेळगाव महापालिकेवर कन्नड संघटनेने लाल-पिवळी ध्वज फडकविल्याने तेथील मराठी बांधवांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मोर्चा काढण्यात येणार होता. पण प्रशासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे कोल्हापूरातील शिवसैनिक संतापले होते. त्यांनी बेळगावमध्ये जाऊन भगवा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यासाठी शेकडो शिवसैनिक बेळगाव सीमेवर पोहचले होते. पण पोलिसांनी त्यांना अडविल्याने वाद निर्माण झाला होता. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com