शिवसेनाप्रमुख जेव्हा हिंदुत्वासाठी उभे राहिले..तेव्हा तुम्ही कोठे होता..मुख्यमंत्र्यांचा सवाल - CM Uddhav Thackeray today criticized the opposition regarding Hindutva | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनाप्रमुख जेव्हा हिंदुत्वासाठी उभे राहिले..तेव्हा तुम्ही कोठे होता..मुख्यमंत्र्यांचा सवाल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मार्च 2021

"आम्ही तेव्हाही हिंदू होतो अन् आजही हिंदूच आहोत," असे ते म्हणाले. मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते.  

मुंबई : "संत नामदेवाचे स्मारक व्हायलाच पाहिजे," असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाबाबत आज विरोधकांवर टीका केली. "आम्ही तेव्हाही हिंदू होतो अन् आजही हिंदूच आहोत," असे ते म्हणाले. मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते.  

उद्धव ठाकरे म्हणाले, "आरे कारशेडच्या प्रश्नांवरून एकत्र येण्याची गरज आहे. मेट्रो जर केंद्र आणि राज्य दोन्हीची असेल तर जागा तुझी माझी कशाला..केंद्र व राज्य दोन्हींनी मिळून हा प्रश्न सोडविला पाहिजे. विदर्भ वेगळा होणार नाही, मी माझं आजोळ तोडणार नाही, विदर्भासह महाराष्ट्राचा विकास करण्यात येईल."  

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनीही भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, दिल्लीत कृषी कायद्याबाबत जे शेतकरी आंदोलन करीत आहेत, त्यांचे वीज कनेक्शन, पाणी तोडले जात आहे. त्याच्या मार्गावर खिळे मारण्यात आले. शेतकरी हे अतिरेकी आहेत का.. सरकारने चीनी सैनिकांना रोखण्यासाठी सीमेवर खिळे मारण्याची गरज होती. सरकारची अवस्था ही 'चीनी सैनिक दिसले की पळा' अन् शेतकऱ्यांच्या मार्गात मारा खिळे' अशी झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यानी यावेळी केली.

ठाकरे म्हणाले की, भाजपची मातृसंस्था ही स्वातंत्र्यलढ्यातही नव्हती, त्यामुळे त्यांना 'भारत माता की जय' म्हणण्याचा अधिकार नाही. देश ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, अऩ् महाराष्ट्र तर नाहीच नाही. शरजील उस्मानी ही उत्तरप्रदेशातील घाण आहे. त्याला अटक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.    

बाळासाहेब ठाकरे यांची आठवण ठेवल्याबाबत मुख्यमंत्र्यानी भाजपला धन्यवाद दिले. ते म्हणाले, "बाबरी पाडली तेव्हा त्यांची जबाबदारी घेण्यास कोणी पुढे आले नाही. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  
यांनी सांगितले की बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे, त्यांचा गर्व आहे. बाळासाहेब जेव्हा हिंदुत्वासाठी उभे राहिले तेव्हा तुम्ही कोठे होता."

बिहारशी तुलना करून महाराष्ट्राची बदनामी; मुख्यमंत्री विरोधकांवर भडकले
  
आर्थिक पाहणी अहवालावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधासनभेत आज विरोधकांवर चांगलेच भडकले. अहवाल तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी कोरोनावर अहवाल तयार केला आहे. ही थट्टा असल्याचे सांगत मुख्यमंत्री यांनी बिहारशी तुलना करून काढण्यात आलेल्या निष्कर्षाच्या आधारे विरोधकांकडून महाराष्ट्राला बदनाम केले जात असल्याची टीका केली. 

कोरोना काळात राज्य सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभेत दिली. यावेळी त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. बिहारचा कोविडमधला फोलपणा समोर आला आहे. तिथे होणाऱ्या चाचण्या तसेच इतर बाबींचे सत्य समोर आले आहे. हे निकष धरून महाराष्ट्राला बदनाम करत आहात. महाराष्ट्रातील यंत्रणेवर विश्वास न ठेवता महाराष्ट्राला बदनाम करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख