`माझं कुटुंब, माझी जबाबदारी`, ही टेप मुख्यमंत्र्यांनी वाजवू नये : चित्रा वाघ - chitra wagh criticizes Uddhav Thacerya for ignoring women safety | Politics Marathi News - Sarkarnama

`माझं कुटुंब, माझी जबाबदारी`, ही टेप मुख्यमंत्र्यांनी वाजवू नये : चित्रा वाघ

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

पारोळा येथील त्या मुलीवर अत्याचार करून तिला मारून टाकणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाघ यांनी केली.

जळगाव : ‘माझं कुटूंब, माझी जबाबदारी’ही टेप मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कायम वाजवित आहेत. मात्र राज्याचा कुंटूबप्रमुख म्हणून ती निभवत मात्र नाहीत. राज्यात आज मुलींच्या अब्रुचे धिंडवडे काढले जात आहेत, महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत. या नराधमावर कडक कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यामुळे त्यांनी राज्यातील कुंटूबप्रमुख म्हणून महिला सुरक्षा करण्याची आपली ‘जबाबदारी’पार पाडावी अन्यथा ही टेप बंद करावी, असा खणखणीत इशारा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला. जळगाव येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होते.

जळगाव जिल्हयातील पारोळा येथील पिडीतेच्या कुंटुबियांची भेट त्यांनी घेतली. त्यानंतर पोलीस अधिक्षकांची भेट घेवून या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे,आमदार सुरेश भोळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना चित्रा वाघ म्हणाल्या, पारोळा येथील त्या मुलीवर अत्याचार करून तीला मारून टाकणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आज राज्यात अत्यंत गंभीर परिस्थीती आहे. महिला व मुलीवरील अत्याचार वाढला आहे. हाथरस येथील मुलींवरील झालेल्या अत्याचाराचा निषेध केलाच पाहिजे, मात्र त्यावेळी रस्त्यावर येवून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने पारोळ्याच्या घटनेप्रकरणीही तेवढ्याच तडफेने आंदोलन केले पाहिजे. परराज्यांतील मुलींना अब्रु आहे, आणि आमच्या महाराष्ट्रातील महिला व मुली रस्त्यावर पडल्या आहेत काय? महिला सशक्तीकरण, सबलीकरण असे मोठे शब्द वापरले जातात प्रत्यक्षात मात्र राज्यात मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचार होत आहेत. ते थांबले पाहिजेत.

‘माझे कुंटूब, माझी जबाबदारी’अशी घोषणा मुख्यमंत्री देत असतांत परंतु प्रत्यक्षात मात्र कुंटूबप्रमुख म्हणून ते कोणतेही जबाबदारी निभवित नाहीत. त्यामुळे त्यांनी अगोदर महिलांच्या सुरक्षेची जबाबादारी निभवावी असे अवाहनही त्यांनी केले.

महिला न्यायालय स्थापन करा
राज्यात महिलावर वाढणारे अत्याचार ही बाब अत्यंत गंभीर आहे असे मत व्यक्त करून त्या म्हणाल्या, या घटना रोखण्यासाठी शासनाने पाउले उचलली पाहिजेत. या प्रकरणी कारवाई होण्यासाठी राज्यात महिलासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन केले पाहिजे. दिशा कायदा त्वरीत आमलात आणला पाहिजे, महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ताबडतोब केली पाहिजे. असे अवाहनही त्यांनी केले.यावेळी माजी आमदार स्मिता वाघ यांनी पारोळा येथील घटनेप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविला पाहिजे. असे मागणी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख