The Chief Minister said, "The academic year will drop. | Sarkarnama

मुख्यमंत्री म्हणाले, "शैक्षणिक वर्ष ड्रॉप करणार..."   

उमेश घोंगडे  
रविवार, 2 ऑगस्ट 2020

शैक्षणिक वर्ष ड्रॉप करणार म्हणजे नेमके काय करण्याचा विचार सरकारच्या मनात आहे. याचा उलगडा होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

पुणे : कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाच्या नुकसान होत आहे. अद्याप एकही वर्ग सुरू होऊ शकला नाही. ऑनलाइन वर्ग ग्रामीण भागात शक्य नाहीत. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष ड्रॉप करण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविला आहे. मात्र, वर्ष ड्रॉप करणार म्हणजे नेमके काय करणार याबाबत त्यांनी स्पष्टीकरण न दिल्याने निर्णय काय होणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

एका दूरचित्रवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी हे विधान केले होते. शैक्षणिक वर्ष ड्रॉप करणार म्हणजे नेमके काय करण्याचा विचार सरकारच्या मनात आहे. याचा उलगडा होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या वर्षीचे सगळे वर्ग बंद ठेऊन विद्यार्थी आता ज्या वर्गात आहेत तेच वर्ग पुढच्यावर्षी पुन्हा सुरू करणार की यावर्षी विद्यार्थी ज्या इयत्तेत आहेत. त्यांना पुढच्या वर्षी पुढच्या इयत्तेत प्रवेश देणार याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेचा नेमका अर्थ न लावता आल्याने हा गोंधळ आहे. सरकारच्यावतीनेदेखील यावर अद्याप कोणतेच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

जून महिन्यापासून अद्याप एकही वर्ग सुरू होऊ शकला नाही. दहावी, बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले. मात्र. पुढच्या वर्गाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकल्या नाहीत. नीट, जेईई, महासीईटी यासह उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठीची कोणतीच प्रवेश परीक्षा होऊ शकलेली नाही. पदवी परीक्षा घ्यायच्या की नाही याचा गोंधळ कायम असून हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. येत्या १० ऑगस्टला त्यावर निर्णय अपेक्षित आहे. या विषयावरून विविध राज्य सरकारे विरूद्ध विद्यापीठ अनुदान आयोग तसेच पर्यायाने केंद्र सरकार अशी राजकीय लढाई सुरू झाली आहे.या साऱ्या पाश्‍र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेने गोंधळात आणखी भर पडली आहे.

पुण्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. मात्र, राज्यात डीएड, फार्मसी, कृषी पदवी, पदविका, अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह कुठल्याच अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा तसेच यातील बहुतांश अभ्यासक्रमाच्या गेल्या वर्षीच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे राहिलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार का ? झाल्या तर कशा होणार ? नव्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे काय होणार याचे नेमके उत्तर कुणीच देऊ शकत नसल्याचे सारेच घटक हवालदिल झाले आहेत.

Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख