काँग्रेसचे मतपरिवर्तन करा..चंद्रकांतदादांचा शिवसेनेला सल्ला  - change congress opinion bjp leadar chandrakant patil advice to shivsena aurangabad | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचे मतपरिवर्तन करा..चंद्रकांतदादांचा शिवसेनेला सल्ला 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जुन्या मित्र असलेल्या शिवसेनेला सोमवारी सल्ला दिला. 

पुणे : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसचे मतपरिवर्तन करून पुन्हा नव्याने ठराव पाठवावा,' असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जुन्या मित्र असलेल्या शिवसेनेला सोमवारी दिला. 

"औरंगाबाद महापालिकेत आमची सत्ता आली, तर नामांतराचा पहिला ठराव करून पाठवू,' असेही पाटील म्हणाले. कोथरूड विधानसभा मतदार संघातील विकास कामांचा आढावा बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास शिवसेनेने भूमिका घ्यावी. याविषयात राजकारण करू नये.

औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का?. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नावे बदलण्याचा प्रस्ताव मागे घेतल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात द्यावे लागले होते. आता पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागेल. महापालिकेत ठराव करून राज्य सरकारला पाठवावा लागेल. नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट असल्याचेही ते म्हणाले. औरंगाबाद नामांतराबाबत सध्या वाद सुरू आहे. यावरून राजकारण पेटले आहे. भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

परप्रांतीयांबाबतची भूमिका स्पष्ट करा 
आगामी महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती संदर्भात दोन्ही पक्षांच्या पातळीवर कोणतीही चर्चा नाही. परंतु युती करण्यापुर्वी परराज्यातून आलेल्या परप्रांतीयांबद्दलची भूमिका मनसे स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही, असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना पाटील म्हणाले.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी याबाबत टि्वट करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात, ''शहरांची नावे बदलाण्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर डोळे वटारले...कुणीही यावे टपली मारून जावे अशी सत्ताधारी शिवसेनेची केविलवाणी स्थिती झाली आहे...''

भाजपने नामांतराच्या मुद्यावर शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. नामांतरावरुन महाविकास आघाडीत असलेल्या मदभेदावरुन शिवसेनेचा रंग आता हिरवा झाला आहे का, असा थेट सवाल भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टि्वटरवर विचारला आहे. 

काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं, यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. औरंगाबादच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले, ''महाविकास आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही सामोपचाराने मार्ग काढू.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख