.. अरे बापरे..भीती वाटते मला..चंद्रकांतदादा पत्र लिहिणार : राऊत - chandrakant patil write letter Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

.. अरे बापरे..भीती वाटते मला..चंद्रकांतदादा पत्र लिहिणार : राऊत

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 2 जानेवारी 2021

सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील.

पुणे : सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. याबाबतीत आताही संजय राऊत यांनी आपल्या यांच्या ईडीची नोटीस आल्यावर तशीच भाषा वापरली आहे. मी 'सामना'च्या संपादिका रश्मी वहिनींना पत्र लिहिणार आहे. ही तुमची भाषा असू शकत नाही. मग अग्रलेखात ही भाषा कशी, असे त्यांना विचारणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितले होते. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले, ''अरे बापरे… ताबडतोब… लगेच. मला आता त्यांची भीती वाटतेय… ते पत्र लिहतायेत.. वा वा. सामना वाचतात. सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील.''

''सकारात्मक नजरेतून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे,” असा टोलाही राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

काल कोथरूड- कर्वेनगर येथील कार्यक्रमापूर्वी पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते की औरंगाबाद शहराचे संभाजीनगर हे नामांतर करायचे आहे. हा आमचा राजकीय मुद्दा नाही. हा निवडणुकीचा नाही, तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा याला विरोध आहे. तर शिवसेनेला नामांतर पाहिजे आहे.

यात आम्हाला पडायचं नाही. सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगर नांव देण्याची केली होती. तुम्ही गोधड्या वाळवत आहात म्हणता तर आता करा नामांतर.  काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का आणि समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला? ते ही पहिले हटवा.

नवीन वर्षात जास्त प्रवास करणार आणि पक्ष संघटना मजबूत करणार तसेच ग्रामपंचायत , नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुका ताकदीनं लढणं आणि जिंकण हे आपले नव्या वर्षाचे उद्दीष्ट असल्याचे पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.२०२२ साली मुंबईत सत्ता आणणं हेच नवीन वर्षाच लक्ष्य आणि संकल्प आहे, मुंबई ही काही जणांची जहागिरी बनलीये, मात्र मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष झालंय फक्त पैसै मिळवण हेच उद्दीष्ट आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. २०२२ नंतर दोनच वर्ष राहताहेत. लोकसभा आणि विधानसभेला बघुयात असं म्हणत त्यांनी पुढची रणनिती स्पष्ट केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख