शरद पवारांच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलाचं प्रत्युत्तर... - Chandrakant Patil reply to Sharad Pawar statement regarding Agriculture Act | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलाचं प्रत्युत्तर...

सागर आव्हाड
रविवार, 6 डिसेंबर 2020

शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे. 

पुणे :  दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून राज्यात आंदोलन करणाऱ्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडेबोल सुनावले आहेत. शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे. 

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी कायदा रद्द होणार नसल्याचं सांगितले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला  अभिवादन करण्यासाठी चंद्रकांत पाटील आले होते, त्यावेळी ते बोलत होते 

या आंदोलनाबाबत मुंबई येथे शरद पवार म्हणाले की देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशीच माझी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारनं शहाणपणाची भूमिका घेणं महत्वाचे आहे. 

पवारांच्या या व्यक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, "सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा तयार केला आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही, जे जुन्या कायद्यात होतं, तेचं आहे, फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली जी आधी नव्हती, प्रश्न फक्त एमएसपीचा होता, केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे, तरीही 'आम्ही आंदोलन करणार , भारत बंद करणार' असं म्हणणं याला काही अर्थ नाही, केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही ,फक्त कायद्यात बदल केला जाईल."

'पदवीधर निवडणुकीत प्रचाराच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईल, असं वक्तव्य केलेलं होतं, मात्र, हा प्रश्न विचारला असता त्यांनी यावर बोलायला नकार दिला. देशात केलेल्या कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत, यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, "लोकशाही आहे, लोकशाहीत कोणीही भेट घेऊ शकतं, भेट घेत असतील तर त्यांच स्वागत आहे."

कृषी कायद्यांच्या विरोधात गेले दहा दिवस दिल्लीच्या सीमांवर आणि कडाक्याच्या थंडीत अहिंसात्मक मार्गाने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी आणि सरकारचे
प्रतिनिधित्व करणारे तीन मंत्री यांच्यात काल झालेली पाचव्या फेरीची चर्चाही निष्फळ ठरली. आता पुन्हा 9 डिसेंबरला चर्चेची पुढील फेरी होणार आहे.

(Edited  by : Mangesh Mahale)
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख