शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे रवींद्र चव्हाण यांना बळ; श्रीकांत भारतीय सरचिटणीसपदी

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बहुप्रतिक्षित कार्यकारिणीचे जंबो स्वरूप या ना त्या निमित्ताने चर्चेत असले तरी त्यात खऱ्या अर्थाने दोन महत्वाचे चेहरे ठरले आहेत, ते माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री कार्यालयातील माजी विशेष अधिकारी श्रीकांत भारतीय. अत्यंत महत्वाच्या सरचिटणीसपदी या दोघांना नेमण्यात आले आहे.
BJP's Ravindra Chavan gets strength in Shiv Sena's stronghold
BJP's Ravindra Chavan gets strength in Shiv Sena's stronghold

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बहुप्रतिक्षित कार्यकारिणीचे जंबो स्वरूप या ना त्या निमित्ताने चर्चेत असले तरी त्यात खऱ्या अर्थाने दोन महत्वाचे चेहरे ठरले आहेत, ते माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री कार्यालयातील माजी विशेष अधिकारी श्रीकांत भारतीय. अत्यंत महत्वाच्या सरचिटणीसपदी या दोघांना नेमण्यात आले आहे. 

शिवसेनेचा प्रभाव असलेल्या ठाणे परिसरात गेली दोन ते तीन वर्षे रवींद्र चव्हाण संपूर्ण ताकदीनिशी लढत भाजपचे पाय रोवत आहेत. आज या कर्तृत्वाची दखल घेत त्यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. 

श्रीकांत भारतीय हे कित्येक वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेचे काम करत. त्यानंतर ते विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संघ परिवारात आले. नागपुरात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केल्यावर ते राजकारणात भाजपमध्ये आले. मिठ्ठास वाणी, दांडगा संपर्क यामुळे ते बड्या नेत्यांच्या जवळ पोहोचतात. विदर्भानंतर त्यांनी काही काळ पुण्यात काम केले. तेथे त्यांच्यावर नाराज झालेली मंडळी खासगीत काही कुजबुजत. 

भारतीय यांच्यावरील आक्षेप खोटे ठरवत पक्ष आणि सरकारमधील दुवा म्हणून त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी नेमले. ते करतात काय, असा प्रश्न काही जण विचारत असले तरी त्यांच्या कक्षाबाहेर प्रचंड गर्दी असे. 

अनाथांसाठी आरक्षणसारखे निर्णय झाले ते त्यांच्या आग्रहामुळेच. सत्ता गेल्यानंतर आता त्यांना पक्षात महत्वाचे पद दिले आहे. त्यांचे भाऊ तुषार हे अमरावतीत सक्रीय आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुनर्वसन करतानाच या दोघांना मिळालेली पदे महत्वाची आहेत. 

नाराज खडसेंच्या घरात भाजप प्रदेशची दोन पदे 

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला आहे. आज (ता. 3 जुलै) जाहीर झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत खडसे यांना विशेष निमंत्रित म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. याचबरोबर त्यांचा सूनबाई खासदार रक्षा खडसे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनीही यापूर्वी राज्याच्या कार्यकारिणीत अनेक वर्षे सरचिटणीस म्हणून काम केले आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना संधी मिळणार काय? याकडेच सर्वांचे लक्ष होते. भाजप सत्तेवर असताना खडसे यांना मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पक्षातर्फे अनेक ठिकाणी डावलण्यात येत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मुक्ताई नगर मतदार संघातून उमेदवारीही नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर पक्षातर्फे वर्णी लागणार असल्याची चर्चा होती, त्यांचे नावही केंद्रांकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर ऐनवेळी त्यांचे नाव कापण्यात आले आणि त्यांची विधान परिषदेवरची संधीही हुकली. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत तरी खडसे यांचे नाव कायम राहणार का? याकडे सर्वाचे लक्ष होते. एकनाथ खडसे तब्बल तेरा वर्षे प्रदेश कार्यकारिणीचे सरचिटणीस होते. त्यानंतर त्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या वेळी ते विशेष निमंत्रित सदस्य राहणार की नाही, याबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यामुळे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी समितीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष होते. 

आज जाहीर झालेल्या समितीत पक्षाने एकनाथ खडसे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून कायम ठेवले आहे. त्यांच्या बरोबर माजी मंत्री गिरीश महाजन यांचाही विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये सामावेश करण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com