BJP will have 'these' candidates from Pune graduate constituency ..? | Sarkarnama

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे 'हे ' असतील उमेदवार..?

उमेश घोंगडे  
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पुण्यातून शेखर चरेगावकर, सुहास पटवर्धन, राजेश पांडे यांच्यासह पक्षाकडे बरेच इच्छुक आहेत.

पुणे : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातून माजी मंत्री हर्षवधन पाटील हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार होऊ शकतात. पक्षाने पाटील यांना याबाबत अद्याप काही सांगितले नसले तरी पक्ष नेतृत्वाच्या मनात पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.  

राज्यातील इतर पदवीधर मतदारसंघातील जातीय समीकरण लक्षात घेऊन पुण्याची उमेदवारी पक्षाला ठरवावी लागणार आहे. नागपूर तसेच औरंगाबाद मतदारसंघात मराठा समाजाला स्थान देता आले नाही. तर पुण्यातून या समाजाचा उमेदवार पक्षाला द्यावा लागणार आहे. वास्तविक पुण्यातून शेखर चरेगावकर, सुहास पटवर्धन, राजेश पांडे यांच्यासह पक्षाकडे बरेच इच्छुक आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पसंतीदेखील यांनाच आहे. मात्र, निवडणुकीतील यशाच्या दृष्टीने विचार केला तर मराठा समाजातील उमेदवार पक्षाला शोधावा लागणार आहे. मात्र, पक्षाकडे तसा सक्षम उमेदवार नाही. कराडचे अतुल भोसले हे चांगला सक्षम पर्याय पक्षाकडे आहे. मात्र, भोसले यांना विधानसभेतून निवडून जायचे आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कडवी झुंज दिली होती.

माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांचे नावदेखील चर्चेत आहे. मात्र, त्यांच्या नावाला पक्ष नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे पक्षाची गरज म्हणून हर्षवर्धन पाटील यांचे नाव पुढे आले आहे. पाटील हे सलग वीस वर्षे राज्यात मंत्री राहिले आहेत. मात्र, गेल्या दोन निवडणुकात पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अपयश आले आहे. राज्यमंत्री मंत्रीमंडळात सध्या मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांच्याकडून ते पराभूत झाले आहेत. 

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून निवडणूक लढविली होती. त्यामुळे पाटील यांना पक्षाने खरोखरच निवडणूक लढवायला सांगितली तर त्यांची कितपत तयारी असेल या बाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

सप्टेबर-ऑक्टोबर महिन्यानंतर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. या मतदासंघातून दोन वेळा आमदार झालेले चंद्रकांत पाटील हे पुण्यातून कोथरूडमधून विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे केवळ प्रदेशाध्यक्ष म्हणून नव्हे तर या मतदारसंघाचे दोनदा नेतृत्व केल्याने यावेळी उमेदवार निवडीत पाटील यांची भूमिका महत्वाची राहणार आहे.

Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख