BJP state executive member Vasantrao Wani passes away | Sarkarnama

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंतराव वाणी यांचे निधन 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

वसंतराव वाणी हे पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. पक्षाचे प्रदेश समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

पुणे : वाणी समाजाचे ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य वसंतराव वाणी (वय 76) यांचे आज (ता. 15 सप्टेंबर) पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वाणी हे मूळ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्‍यातील कुंजर येथील रहिवासी आहेत. 

वसंतराव वाणी हे पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. पक्षाचे प्रदेश समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मात्र, काही कारणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपच्या राज्य कार्यकारणीचे ते सध्या सदस्य होते. 

एक धडाडीचा संघटक म्हणून त्यांची पिंपरी चिंचवड शहराला ओळख होती. पिंपरी चिंचवड भाजप उभारणीत वाणी यांची मोलाची कामगिरी होती. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा एक निस्सिम स्वयंसेवक म्हणून त्यांची गणना व्हायची. आणीबाणीत त्यांनी 19 महिने नाशिक जेलमध्ये कारावास भोगला आहे. 

(कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे ते विश्वासू मानले जायचे. पिंपरी चिंचवड नवनगर पालिकेचे पहिले नगरसेवक म्हणून निवडून येऊन त्यांनी राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. प्राधिकरण सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. 

कार्यकर्ता उभारणीच्या कामात व त्याच्या जडण घडणीत, त्याला विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच असायचा. ध्यास घेऊन पक्ष विस्ताराच्या कामातील शहरातील कार्यकर्त्याच्या भावनेशी एकरुप झालेला लढवय्या नेता आज आपल्यातून निघून गेला. ही जिवाला चटका लावणारी घटना आहे, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख