पुणे : आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या योजना राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीने कृती योजना आखली आहे. या योजनेनुसार या योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्यावतीने स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात येणार आहे. येत्या काळात राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या योजनेच्या माध्यमातून पक्षाने निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे.
शिवेंद्रसिंहराजेंनी मागितले अन् अजित पवारांनी सातारच्या मेडिकल कॉलेजला दिले ६१ कोटी https://t.co/DgaeXd6MQH
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 17, 2020
आत्मनिर्भर भारतासाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. या योजना गाव पातळीवच्या शेवटच्या माणसापर्यंत नेण्यासाठी काल मुंबईत झालेल्या बैठकीत कृती कार्यक्रम ठरविण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.
या योजनांच्या निमित्ताने जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामंपचायतीच्या निवडणुकांची तयारीच भाजपाने सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रातून आत्मनिर्भर भारताच्या सर्व प्रकारच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या योजनेत आत्मनिर्भर भारताच्या योजनेत विविध व्यवसायांची स्टार्टअप, कर्ज योजना, विविध प्रकारचे व्यवसायांची माहिती देण्यासाठी प्रत्येक केंद्रात भाजपाचे कार्यकर्ते मदत करणार आहेत.
पदवीधर विधान परिषद निवडणुकीतील अपयशामुळे भाजपाचे नेतृत्व पुरते जागे झाल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. निवडणुकीतील अपयशाची चर्चा झाली नाही. मात्र, या अपयशातून पक्षाचे नेत्यांनी बोध घेतल्याचे आजच्या बैठकीवरून स्पष्ट झाले. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी करा. सरकारी योजना सामान्य माणसापर्यंत पोचविताना निवडणुकांचे नियोजनदेखील लक्षात असू द्या त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले.या बैठकीला राज्यभरातून पक्षाचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

