औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात आमच्या विरोधकांकडून लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात रडीचा डाव सुरू आहे. काही लोकांनी माझ्या नावाचा आणि चुकाचा मोबाईल क्रमांक माझा असल्याचे भासवत प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी फेक अकांऊंट देखील उघडण्यात आले असून या गंभीर प्रकाराची मी निवडणूक आयोगाशी देखील संपर्क साधला आहे. या संदर्भात पोलिसांची देखील मदत घेतली जात आहे. विरोधकांकडे आमच्या उमेदवाराविरुध्द बोलण्यासारखे काहीच उरले नसल्यामुळे ते इतक्या खालच्या पातळीवर उतरल्यामुळे आपल्याला दुःख झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची प्रक्रिया चालु असतांना खासदार सुप्रिया सुळे यांचा ध्वनीमुद्रीत आवाज गुंटुर येथील मोबाईल वरुन सुपरइंपोज करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ उस्मानाबादेतील एका स्थानिक त्रिस्तरीय भाजपा नेत्यांचा आवाजात विरोधी पक्षाचा उमेदवाराच्या (भाजप) प्रचाराचा आॅडिओ मेसेज मोठ्या प्रमाणात फिरवला जात आहे. या प्रकाराची माहिती मिळताच सुप्रिया सुळे यांनी फेसुबक लाईव्ह करत या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या नावाचा, आवाजाचा आणि खोटा मोबाईल क्रमांक टाकून प्रचार करतायेत असे फोन मला लातूर आणि उस्मानाबादच्या सहकाऱ्यांकडून आले. काही चॅनल आणि वर्तमान पत्रांच्या प्रतिनिधीनींही या संदर्भात माझ्याकडे विचारणा केली. हा प्रकार अंत्यत दुर्दैवी आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात इतकी पातळी साोडून विरोधक प्रचार करतायेत. मी ताडीने पोलीस यंत्रणेची मदत घेतली आहे. निवडणूक आयोगाशी देखील संपर्क साधला आहे. आमचे उमेदवार सतीश चव्हाण यांना देखील भाजपच्या या रडीच्या डावाची कल्पना दिली आहे.
माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये, की पदवीधरच्या निवडणुकीत विरोधक एवढी पातळी सोडून माझ्या नावाचा गैरवापर करून फेक मोबाईल नंबर, फेक अकाऊंटच्या माध्यमातून प्रचार करतायेत. या प्रकाराचा मी निषेध करते. हा स्व. यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, इथे असा रडीचा डाव खेळणे योग्य नाही. मला कुणावर आरोप करायचा नाही, पण हे जे कुणी आहेत ते तंत्रज्ञानाचा गैरवापर करतायेत हे योग्य नाही.
मी आमचे उमेदवार सतीश चव्हाण यांना तातडीने पोलीसांची मदत घेऊन निवडणूक आयोगाकडे न्याय मागितला पाहिजे, असे सांगितले आहे. अशा प्रकारे चुकीचा आणि खोटा प्रचार करणाऱ्यांना शिक्षा देखील झालीच पाहिजे. अशा पातळी सोडून खोटा प्रचार करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करते. कृपा करून कुणीही अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, हे सांगण्यासाठी मी हे फेसबुक लाईव्ह केले आहे. माझा पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांची खोटी बदनामी करू नका, तुमच्याकडे काही विषय नसतील तर गप्प राहा, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना सुनावले.
राजकारणात आपण लोकांची सेवा करण्यासाठी येतो, मग असा रडीचा डाव, खोटा प्रचार कशासाठी. निवडणुकीत हार-जीत होत असते. पण हा जो प्रकार विरोधकांकडून सुरू आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा असल्याची खंत देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवा सतीश चव्हाण यांनी देखील या प्रकाराबद्दल निवडणूक निर्वाचन अधिकारी तसेच औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. करावी अशी मागणी केली आहे.
Edited By : Jagdish Pansare

