मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवून परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काल दिला आहे. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जमिनीच्या वापरावरुन उच्च न्यायालयानं महाविकास आघाडी सरकारचा दणका दिला आहे. यावरून राजकारण पेटले आहे. आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून राज्य सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे.
मुंबई मेट्रो-3च्या कांजूरमार्गमधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं काल स्थगिती आणली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली होती. हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ही जमिन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल करतानाच त्यांनी महाराष्ट्रातील सरकार भाजपचं नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का, अशी शंका देखील उपस्थित केली होती.
संजय राऊतांच्या या विधानावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा न्यायालयाचा अवमान असल्याचं म्हणत संजय राऊतांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत भातखळकरांनी टि्वट केले आहे. आपल्या टि्वटमध्ये ते म्हणाले, ‘कांजुरमार्ग जमीन वाद – राऊत म्हणतात, मोठं षडयंत्र!… न्यायालयाच्या निर्णयाला षड्यंत्र म्हणणे हा न्यायालयाचा अपमान असून याविरुद्ध संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी…’
कांजुरमार्ग जमीन वाद - राऊत म्हणतात, मोठं षडयंत्र!...
न्यायालयाच्या निर्णयाला षड्यंत्र म्हणणे हा न्यायालयाचा अपमान (contempt of court) असून याविरुद्ध संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी... pic.twitter.com/cop1WuA6st— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 17, 2020
भाजप नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राम कदम आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "महाविकास आघाडी सरकारनं बाल हट्टा पोटी मुंबईकरांचे साडे पाच हजार कोटी खड्ड्यात घातले आहे."
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पयर्टन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर काल निशाणा साधला होता. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करण्यापेक्षा न्यायालयात बोलायचं होतं. ते बालिश आहेत, अशा शब्दांत टीका किरीट सोमाय्या यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच केंद्र किंवा राज्य सरकार कोणीही विकासकामात अडथळा आणू नये असं स्पष्ट मत मांडलं आहे.
याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात सरकार आहे. या निर्णय़ामुळे मेट्रो तीनच्या कामाला ब्रेक लागला आहे. अगोदरच रखडलेले कारशेडचे काम आता दोन महिने पूर्ण ठप्पच होणार आहे. पुढेही ते न्यायालयीन प्रक्रियेतच अडकून राहणार असल्याने एकूणच मेट्रो विस्तार प्रकल्प आणखी रेंगाळणार आहे. दरम्यान, या निर्णयाने भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

