मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हक्कालपट्टी व्हावी, अशी मागणी, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. काल सकाळी दहा वाजल्यापासून समीर खान यांना एनसीबीच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. आरोपी करन सजनानीच्या चौकशीमध्ये समीर खान यांचं नाव आल्याने एनसीबीनं त्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं होतं.
एनसीबीने वांद्रे पश्चिममधून एका कुरियरकडून गांजा जप्त केला होता. या चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, खारमधील करण सजनानी याच्या घरी छापा टाकण्यात आला होता. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी सजनानी, राहिला फर्निचरवाला, शाहिस्ता फर्निचरवाला आणि रामकुमार तिवारी यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात समीर खान यांचे नाव समोर आले होते. त्यांना आज चौकशीसाठी एनसीबीने बोलावले होते. चौकशी झाल्यानंतर एनसीबीने त्यांना अटक केली.
कार्यकर्ते मात्र बाहेरच#राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/JWjYXEQ6B0
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 14, 2021
समीर खान यांचा विवाह नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांच्याशी झाला आहे. समीर खान आणि करण सजनानी यांच्यात गुगल पे द्वारे २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ड्रग्स पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला असल्याचा संशय एनसीबीला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावले होते.
एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला दुकानाचा मालक रामकुमार तिवारी यालाही अटक करण्यात आली असून, त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आले आहे. खान हे करन सजनानीच्या नेहमी संपर्कात होते. याबाबत एनसीबीने त्यांची चौकशी सुरु केली आहे. आज खान यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.

