मुख्यमंत्रीपद लाटताना द्विधा मन:स्थिती नव्हती..? - BJP leader Atul Bhatkhalkar targets Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्रीपद लाटताना द्विधा मन:स्थिती नव्हती..?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : टिकटाँकस्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणाशी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत भातखळकर यांनी टि्वट केलं आहे.

आपल्या टि्वटमध्ये भातखळकर म्हणतात की, युतीला मिळालेला जनमताचा कौल डावलून लाचारीने मुख्यमंत्रीपद लाटताना फक्त द्विधा मन:स्थिती नव्हती. वनमंत्री संजय राठोडांवर कारवाई करताना मात्र मुख्यमंत्र्यांची मन:स्थिती नेहमीप्रमाणे द्विधा झाली आहे म्हणे, ही मनस्थिती द्विधा नसून निर्लज्ज आणि निबर मनस्थिती आहे.

राज्यात काही दिवसात वाढत चालेल्या गुन्हेगारीबाबत अतुल भातखळकर म्हणतात, "महाराष्ट्रात आता दरोडेखोर पोलिसांचा गणवेश घालून दरोडे टाकू लागले आहेत. घरबसलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना भारतरत्नांची चौकशी, भाजपच्या आयटी सेलची चौकशी अशा महत्वपूर्ण कारवायांमुळे असल्या किरकोळ गुन्ह्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही."

शेतकरी आंदोलनाबाबत भातखळ आपल्या टि्टवमध्ये म्हणतात की राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही, हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले आहे, असे ते म्हणाले.   

दोन जण पुणे पोलिसांच्या ताब्यात

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या दोघांपैकी एकजण अरुण राठोड यांचा निकटवर्तीय असल्याचे समजते. या प्रकरणात अरुण राठोड हा फरारी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करण्यासाठी यवतमाळ आणि परळीत गेलेल्या पोलिसांच्या पथकाने या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अरुण राठोडला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

पोलिस योग्यप्रकारे तपास करत नसल्याचे आरोपही विरोधकांनी केले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांकडून पुणे पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे राज्याच्या पोलिस महासंचालकांचेही या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांकडून यवतमाळमध्येही याप्रकरणाचे धागेदोरे शोधले जात आहेत. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणात प्रमुख माहितगार असलेला अरूण राठोड याचा शोध पोलिस घेत आहेत. या मृत्यू प्रकरणामध्ये कथित मंत्र्यासोबत राठोडचा संवाद असल्याने तो एकदम झोतात आला आहे. अरुण राठोड याच्याशी बोलतानाच संबंधित मंत्री पूजाचा मोबाईल ताब्यात घेण्याच्या सूचना करताना ऐकू येत होते. पोलिसांनी त्याचा जबाब घेतला असून त्याच्या जबाबात पूजाने मद्य प्राशन केल्याचे म्हटले होते. त्याच्या मोबाईलमधील सर्व आॅडिओ क्लिप एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने घेऊन त्या व्हायरल केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणातील गंभीरपणा अनेकांच्या लक्षात आला. तो वनखात्याचा कर्मचारी असल्याचेही बोलले जाते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख