'जनतेशी नाळ तुटलेले महाबेशरम आघाडी सरकार...'  - BJP leader Atul Bhatkhalkar criticizes Mahavikas Aghadi Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

'जनतेशी नाळ तुटलेले महाबेशरम आघाडी सरकार...' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

 भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई : देशभरातील विविध भागांमध्ये कोरोना लसीच्या वितरणास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात अशा भागांमध्ये कोरोनाची लस निर्धारित ठिकाणांच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहेत. प्रत्येक राज्यात, शहरात या लसीचं मोठ्या उत्साहात आणि तितक्यात सकारात्मकतेनं स्वागत केलं जात आहे. 

कोरोना लसींच्या साठवणुकीकरणासाठी मुंबईत यंत्रणा अपुरी असल्याचे सांगत भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी टि्वट करत हे सरकार महाबेशरम असल्याचे म्हटलं आहे. 

आपल्या टि्वटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात, ''राज्यातील जनतेच्या लसीकरणाला सुरुवात करायची वेळ आली तरीही प्रादेशिक शीतगृहे अपूर्णावस्थेत असणे ही राज्य सरकारच्या निष्काळजीपणा, बेपर्वाई आणि नियोजन शून्यतेची पावती आहे... जनतेशी नाळ तुटलेले महाबेशरम आघाडी सरकार.''
 
सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना भारतात आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. काल पुण्यातील सीरमने तयार केलेल्या लसींचे वितरण करण्यात आले. 

केंद्र सरकारने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या कमी केल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. याबाबत टोपे यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की राज्याला अपेक्षेपेक्षा कमी डोस मिळाले आहेत. राज्यात लसीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. केंद्राने महाराष्ट्रातील केंद्राची संख्या कमी करून 350 केली आहे. या केंद्रामध्ये दिवसाला 20 ते 25 हजार जणांना लस दिली जाणार आहे. राज्याला केंद्राकडून 9 लाख 63 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. स्वतःच्या जीवापेक्षा इतरांच्या जीवांची काळजी महत्वाची आहे, मंत्र्यांना नव्हे तर आरोग्य कर्मचाऱ्यांना आधी ही लस देण्यात येणार आहे.  

महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन करण्यात आली आहे. 

''कोरोना लसींचे दोन डोस घ्यायचे आहेत. ते एकाच कंपनीचे डोस असले पाहिजे. यासाठीची काळजी प्रशासन घेत आहे,'' असे टोपे यांनी स्पष्ट केले. राज्याला अपेक्षेपेक्षा कमी डोस मिळाल्याचा आरोप टोपे यांनी यावेळी केला. ता. 16 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या लसीकरण मोहिमेचे उद्धाटन सोशल मीडीयावरून करण्यात येणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख