मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, निधी मिळत नाही, अशा तक्रारी आल्यानंतर सोनिया गांधी यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विकासाबाबत कारवाई करावी हा हेतू या पत्राचा विषय असला तरी काँग्रेसच्या नाराजीची योग्य दखल शिवसेना आणि राष्ट्रवादी घेत नसल्यामुळेच हे पत्र आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेण्यात आली अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
शेलार यांनी सांगितले की काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्रामुळे ठाकरे सरकार गॅसवर आहे. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्वत:चा पक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून महाविकास आघाडी सरकार गॅसवर आलं आहे.
शेलार यांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रावरूनही राज्य सरकारला घेरलं आहे. त्यांनी याबाबत टि्वट केलं आहे. ते म्हणतात की आंतरराष्ट्रीय केंद्र मुंबईबाहेर नेण्याचा सरकारचा डाव आहे.विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल तर बुलेट ट्रेन होणार नाही आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर घालवणार ? सरकार राज्यातील विकास कामाबाबत शत्रू सारखे वागत आहे? का महाराष्ट्र द्रोह करताय?
◆ आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल तर बुलेट ट्रेन होणार नाही आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर घालवणार ?
◆ का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय?
2/2— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 19, 2020
भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की काँग्रेस सत्तेसाठी लाचार आहे. या सरकारचा कुठलाही किमान समान कार्यक्रम नाही. केवळ सत्ता वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेत्यांची दिशाभूल केली आहे, हे सोनिया गांधी यांच्या पत्राद्वारे स्पष्ट झालं आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले, "राज्यातील मागासवर्ग, गरीब आणि अल्पसंख्याकांना संरक्षण देणं ही काँग्रेसची पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे. त्यामुळे सोनिया गांधी या मुख्यमंत्र्यांशी बोलल्या असतील तर त्यात काही चूक आहे, असं वाटत नाही."

