राष्ट्रवादीने शिवसेनेवर डोळे वटारले... - bjp leadar atul Bhatkhalkar criticize shivsena and ncp  | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीने शिवसेनेवर डोळे वटारले...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

औरंगाबाद नामांतराबाबत सध्या वाद सुरू आहे. यावरून राजकारण पेटले आहे. भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

मुंबई : औरंगाबाद नामांतराबाबत सध्या वाद सुरू आहे. यावरून राजकारण पेटले आहे. भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी याबाबत टि्वट करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात, ''शहरांची नावे बदलाण्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर डोळे वटारले...कुणीही यावे टपली मारून जावे अशी सत्ताधारी शिवसेनेची केविलवाणी स्थिती झाली आहे...''

भाजपने नामांतराच्या मुद्यावर शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. नामांतरावरुन महाविकास आघाडीत असलेल्या मदभेदावरुन शिवसेनेचा रंग आता हिरवा झाला आहे का, असा थेट सवाल भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टि्वटरवर विचारला आहे. 

किरिट सोमय्या व्हिडिओद्वारे म्हणाले की, काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूह्दयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का, असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसची भूमिका काय 
महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे. पण नामंतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. महाविकास आघाडीमध्ये काँमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले आहे. 

आमच्यासाठी संत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले होते.

औरंगाबाद नामांतराबाबत अजित पवार म्हणाले...  
काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं, यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. औरंगाबादच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले, ''महाविकास आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही सामोपचाराने मार्ग काढू.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख