पुणे : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.
चव्हाण मृत्यूप्रकरणी जी सगळी माहिती पुढे आली आहे तिचा रोख राठोडांकडे असल्याचा आरोप करत पोलिसांनी स्वतःहून राठोडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वाघ यांनी केली. एव्हढे पुरावे असतानाही वाट मुख्यमंत्री वाट कशाची बघत आहेत, असा सवाल त्यांनी केला.
एका मंत्र्याशी या मृत्यूचा संबंध जोडला जात असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी या संबंधातील आॅडिओ क्लिप या पोलिस महासंचालकांकडेही दिल्या आहेत. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे की काय, असा संशय विरोधी पक्षनेते व्यक्त करत आहेत.
टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूच्या कारणांचा तपास पोलिसांनी सुरू केला असून तिचा मृत्य म्हणजे आत्महत्याच आहे, असे नोंदविलेले नाही हे स्पष्ट करण्यात आले. तसेच तिच्या मृत्यूबाबत सोशल मिडियात व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिप पोलिसांनाही मिळाल्या आहेत. त्यातील बऱ्याच क्लिप या बंजारा बोलीत असल्याने त्याच्या भाषांतराचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
पूजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने रविवारी (ता. आठ फेब्रुवारी) तिचा मृत्य झाला. महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील फ्लॅटमधअये पूजा हि तिचा भाऊ आणि भावाचा मित्र यांच्यासोबत राहत होती. मूळ परळी वैजनाथ येथील असलेली पूजा ही स्पोकन इंग्रजीच्या क्लाससाठी पुण्यात महिनाभरापूर्वी आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ती गॅलरीतून पडली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. तिचा भाऊ विलास चव्हाण व अरूण राठोड यांनी तिला तेव्हा तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या दाव्यानुसार तिच्या आईवडिलांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मात्र ती काही गंभीर आजाराने त्रस्त असल्याने तिने उडी मारली असावी, असा पोलिसांना जबाब देण्यात आला. सुरवातीपासून तिची आत्महत्या म्हणून सर्वत्र चर्चा आहे. पण पोलिसांनी कायदेशीरदृष्ट्या आत्महत्या म्हणून शिक्कामोर्तब केलेले नाही आणि ते प्रकरण बंदही केलेले नाही.

