बिहारमध्ये नितीश कुमारांना शब्द दिला होता, तो पाळला, तसा उद्धव ठाकरेंना दिला नव्हता.. - In Bihar, Nitish Kumar had given his word, he kept it, he did not give it to Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये नितीश कुमारांना शब्द दिला होता, तो पाळला, तसा उद्धव ठाकरेंना दिला नव्हता..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मातोश्रीवर झालेल्या बैठकीच्या वेळी मी देखील उपस्थित होतो. नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटप अंतिम केले. परंतु या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा कुठलाही शब्द देण्यात आला नव्हता.

औरंगाबाद ः बिहार विधानसभा निवडणुकी पुर्वी नितीश कुमार यांच्याशी झालेल्या चर्चेत आमच्या अध्यक्षांनी कितीही जागा आल्या, तरी मुख्यमंत्री पद तुम्हालाच देऊ असा शब्द दिला होता. त्यामुळे भाजपच्या जागा जास्त असल्या तरी आम्ही नितीश कुमार यांना दिलेला शब्द पाळला. कारण भाजप दिलेला शब्द कधीच फिरवत नाही, तो पाळतेच हे आम्ही दाखवून दिले. महाराष्ट्रात मात्र असा कोणातही शब्द शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांना आमच्या नेत्यांनी दिला नव्हता, असा खुलासा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलातांना केला.

परभणी येथील पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतलेल्या मेळाव्यात रावसाहेब दानवे यांनी दोन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार आणि भाजपची सत्ता येणार असा दावा केला होता. दानवे यांच्याप्रमाणे या निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाड्यात आलेल्या भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी केली होती.

केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी हा दावा केल्यानंतर त्याची राज्यभरात चर्चा देखील सुरू झाली. यावर आता स्पष्टीकरण देतांना दानवे यांनी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असलेली नाराजी, सरकारमधील मंत्री आणि नेत्यांमध्ये नसलेला समन्वय आणि विसंवाद यामुळेच हे सरकार पडणार ्असल्याचा दावा पुन्हा एकदा केला. शिवसेनेने काॅंग्रेस- राष्ट्रवादीशी केलेली आघाडी ही फारकाळ चालणारी नाही. देशाच्या इतिहासात असे सरकार फारकाळ टिकल्याचा इतिहास देखील नाही, आणि म्हणून हे सरकार  दोन महिन्यात पडेल असे आपण म्हटल्याचे दानवे यांनी सांगितले.

मित्रपक्षाने दगा दिला असा आरोप भाजपकडून केला जातो, तर खुद्द उध्दव ठाकरे आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा शब्द देऊन भाजपने तो फिरवाला असे सांगितले जाते. यावर देखील दानवे यांनी खुलासा केला. ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मातोश्रीवर झालेल्या बैठकीच्या वेळी मी देखील उपस्थित होतो. नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटप अंतिम केले. परंतु या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा कुठलाही शब्द देण्यात आला नव्हता.

बिहारमध्ये जी समयसुचकता दाखवली तशी महाराष्ट्रात दाखवली असती तर आज तुमची सत्ता असती, यावर बिहार आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीती वेगळी आहे. शिवाय बिहार विधानसभा निवडणुकीची नितीश कुमार यांच्याशी जेव्हा बोलणी झाली, तेव्हाच तुमच्या पक्षाच्या कितीही जागा आल्या, कमी आल्या तरी मुख्यमंत्रीपद तुम्हालाच देऊ असा शब्द भाजपच्या आमच्या अध्यक्ष आणि इतर नेत्यांनी दिला होता.

बिहार निवडणुकीनंतर भाजपचे आमदार जदयुपेक्षा अधिक निवडूण आले, पण निवडणुकी पुर्वीच नितीश कुमार यांना शब्द दिल्यामुळे आम्ही तो पाळला आणि आज ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात मात्र असा कुठलाही शब्द शिवसेनेला देण्यात आला नव्हता, याचा पुनरुच्चार देखील दानवे यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख