कमळ इजा पोहचविण्यासाठी नाही, हे भूंग्याला कळतं...मी तर माणूस आहे...

पक्षाने माझ्या हिताचा निर्णय घेतला तर पक्ष चांगला..माझ्या मनाविरू्ध निर्णय घेतला तर पक्ष वाईट असे समजणारा मी नाही
कमळ इजा पोहचविण्यासाठी नाही, हे भूंग्याला कळतं...मी तर माणूस आहे...
collage (46).jpg

मुंबई : "पक्षाने माझ्या हिताचा निर्णय घेतला तर पक्ष चांगला..माझ्या मनाविरू्ध निर्णय घेतला तर पक्ष वाईट असे समजणारा मी नाही, मध देणाऱ्या कमळाच्या पाकळ्यांना भुंगा नुकसान करीत नाही. आपण तर माणसं आहोत,"  अशा शब्दांत भाजप नेते विनोद तावडे यांनी आपल्या पक्षनिष्ठेबाबत सांगितले.

पक्षाच्या राष्ट्रीय मंत्रीपदावर निवड झाल्याबाबत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विनोद तावडे यांचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना तावडे बोलत होते. ते म्हणाले की पक्षाने मला अनेक संधी दिल्या. त्यासाठी वेळेप्रसंगी इतर नेत्यांना बाजूला सारले.

मात्र 2019 मध्ये पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली नाही. त्यावेळी मला अनेकांनी आपली ताकद दाखवून देण्याचा सल्ला दिला. चमत्काराशिवाय नमस्कार नाही, असेही सांगितले. अनेक विरू्ध पक्षातील मित्रांनी माझी विचारपूस केली. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी माझी विचारपूस केली. पत्रकार, संपादक यांनीही फोन केले. मात्र, माझा भाजप, संघ, अभाविपचा पिंड कायम असल्याने मला कोणीही त्याच्या पक्षात येण्याचे निमंत्रण देण्याची हिमंत दाखवू शकले नाहीत. 

पक्ष व्यापक हित पाहून निर्णय घेत असतो. आपल्यासाठी फायदेशीर निर्णय असेल तर पक्ष चांगला असे मानणारा मी नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. याच्यावर अधिक बोलताना तावडे यांनी ज्ञानेश्वरीतील ओव्या देखील ऐकविल्या. 
लाकूड तोडण्याची ताकद असलेला भूंगा जेव्हा कमळाच्या पाकळ्यांमध्ये अडकतो तेव्हा तो त्या पाकळ्या फोडून बाहेर येत नाही. मध देणाऱ्या कमळाला इजा पोहचवायची नाही, ते त्या भुंग्याला कळतं. आपण तर माणूस आहोत, असे तावडेंनी सांगितले. 

गेल्या वर्षभरापासून अडगळीत पडलेले तावडे आता पुन्हा मुख्य प्रवाहात आले आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीटही न मिळालेले तावडे नाराज होते. मात्र एकनाथ खडसे किंवा पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे त्यांनी अजिबात त्याबद्दल जाहीरपणे तक्रार केली नव्हती.  आपली नाराजी उघडपणे व्यक्त होणार नाही, याचीही काळजी घेतली होती. त्याचे फळ त्यांना मिळाल्याचे नियुक्तीनंतर स्पष्ट झाले. 

तावडे हे 2014 च्या आधी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना गृहमंत्री होत येईल, अशी अपेक्षा होती. त्यांनी ती बोलूनही दाखवली होती. प्रत्यक्षात त्यांना शिक्षण खाते मिळाले. या खात्यांत वैद्यकीय, शालेय, उच्च शिक्षण, क्रिडा, सांस्कृतिक अशा विभागांचा समावेश होता.  त्यानंतर त्यांच्याकडील एक-एक खाते फडणविसांनी इतर मंत्र्यांना दिले. तेव्हापासून तावडे यांचे पंख छाटले जात असल्याचे बोलले जात होते. आधी वैद्यकीय शिक्षण हे गिरीश महाजनांकडे देण्यात आले. शालेय शिक्षण हे खाते सरकारच्या अखेरच्या टप्प्यात आशिष शेलारांना मिळाले. विधानसभा निवडणुकीत तर तावडेंना तिकिटही मिळाले नाही. या `पडझडी`नंतर ते आता पुन्हा राष्ट्रीय प्रवाहात आले आहेत.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in