शिवसेनेचा गल्लीत नुसताच गोंधळ अन् दिल्लीत सावळा गोंधळ... - Ashish Shelar criticizes Shiv Sena over agriculture bill | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचा गल्लीत नुसताच गोंधळ अन् दिल्लीत सावळा गोंधळ...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

कृषी विधेयकाबाबतची शिवसेनेची भूमिका म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत "सेम टू शेम!" गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!

मुंबई : केंद्र सरकारने काल मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरील शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी टिका केली आहे. याबाबत आशिष शेलार यांनी टि्वट केले आहे. आपल्या टि्वटमध्ये आशिष शेलार म्हणतात की शिवसेनेने सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता. आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठिंबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग केला आहे. कृषी विधेयकाबाबतची शिवसेनेची भूमिका म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत "सेम टू शेम!" गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी कृषी विधेयकाबाबत काही शंका व सूचना उपस्थित करताना त्या विधेयकाचे सशर्त स्वागत केले. त्यामुळे या आठवड्यात दुसऱ्यांदा शिवसेनेने मोदी सरकारच्या विधेयकांचे स्वागत केल्याचे दिसले. या पूर्वी गजानन कीर्तीकर यांनी बॅंकिंग नियमन विधेयकाचेही स्वागत केले होते. 

एरवी राज्यात शिवसेना व भाजप यांच्यातून विस्तव जात नाही, हे अनेकदा दिसून आले आहे. कोरोनाचा फैलाव, सुशांतसिंह आत्महत्या, मराठा आरक्षण आदी मुद्यांवरून दोनही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीकाही केली आहे. मात्र त्याचवेळी लोकहिताच्या मुद्यांवर शिवसेनेने संसदेत मोदी सरकारला विरोध केला नाही, हे देखील दाखविण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांना फायदा होत असेल, त्यांचे उत्पन्न वाढत असेल तर सरकारच्या या दृष्टीकोनाचे स्वागतच आहे. अशा कायद्यासाठी राजकारण करायची गरजच नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर तो राजकीय विषय होऊच शकत नाही. मुळात हा राजकीय विषय नाहीच, असे सावंत यांनी यासंदर्भात सांगितले. 

हे विधेयक काल राज्यसभेत मंजूर झाले, मात्र त्यापूर्वी लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान सावंत यांनी विधेयकाचे सशर्त स्वागत केले. शेतकऱ्यांचे दुखभरे दिन बिते रे भैया, असे 2014 मध्ये वाटले होते, तसे सगळेच झाले नाही. पण यासंदर्भात सरकार गंभीरपणे काम करतंय हे दिसत होते व त्याचे मूर्त स्वरुप म्हणजे हे विधेयक आहे, असेही सावंत म्हणाले. या संदर्भातील सूचना स्वीकारल्या तर त्याचा शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल, असेही ते म्हणाले. 

शेतमालाला किमान हमीभाव देण्याच्या व तो निश्‍चित करण्याच्या मुद्याचा समावेश या विधेयकात हवा तसेच पाच एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांनाही या विधेयकाचा लाभ मिळावा, अशा मुख्य सूचना सावंत यांनी केल्या.शेतकरी समृद्ध व्हायलाच हवा, या मुद्यावर सर्वांचेच एकमत आहे. कृषीमाल आता खुल्या बाजारात विकता येईल हे देखील स्वागतार्ह आहे. मात्र सध्या देशात दोन हजार 477 कृषी उत्पन्न बाजार समित्या, चार हजार 843 सब मार्केट्‌स व एक हजार मंडया आहेत. त्यांच्याशी खुल्या बाजारात माल विकणाऱ्या शेतकऱ्यांना कसे जोडता येईल, हे पहायला हवे. त्यांच्यात संघर्ष होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी, असेही सावंत यांनी दाखवून दिले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख