केंद्राकडे थकबाकी 22 हजार कोटी रुपयांवर : वेळेवर रक्कम देण्याची अजितदादांची मागणी

जीएसटीतील नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून वेळेवर मिळत नाही, त्यामुळे सर्वच राज्यांसमोर आर्थिक संकट आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे.
ajit pawar 12
ajit pawar 12

मुंबई : वस्तू व सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जूलै २०२० पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी येणे असून ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात एक लाख कोटींवर जाईल अशी भीती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ४१व्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेत व्यक्त केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ४१ व्या जीएसटी परिषदेत राज्याच्यावतीने अर्थमंत्री नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते.

जीएसटीतील नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून वेळेवर मिळत नाही, त्यामुळे सर्वच राज्यांसमोर आर्थिक संकट आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. देशातील जवळपास सगळी राज्ये सध्या कोरोना संकटाशी लढत असल्याने केंद्राकडून अधिक निधी मिळालाच पाहिजे. केंद्राने महसुल गॅरन्टी घेतली असल्याने  राज्यांना भरपाईचा निधी वेळेवर देणे ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्राने त्यासाठी कर्ज घ्यावे कारण त्यांना राज्यांपेक्षा कमी दराने कर्ज उपलब्ध होऊ शकते असे मतही  अजित पवार यांनी  व्यक्त केले.

पवार यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांची बाजू मांडताना स्पष्ट केले की, आर्थिक मर्यादांमुळे राज्यांना कर्ज घेणे शक्य नाही. केंद्र सरकारला अल्पदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते, ती सोय राज्य सरकारांना नाही. राज्यांनी जादा व्याजदराने कर्ज घेतल्यास त्याचा अकारण सेसवर परिणाम होईल व अंतिम बोजा ग्राहकांवर पडेल. राज्यांनी खुल्या बाजारातून कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्यास तिथेही व्याजदर वाढण्याची व कर्ज मिळणे दुरापास्त होण्याची भीती आहे. ही वस्तुस्थिती असल्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जीएसटी परिषदेत लक्षात आणून दिले.

राज्यांना जीएसटी नुकसानीपोटी भरपाई देण्यासाठी सुरु केलेल्या सेसची कालमर्यादा पाच वर्षांसाठी म्हणजे येत्या २०२२ वर्षापर्यंत आहे. ही कालमर्यादा वाढवून मिळावी. केंद्राकडून राज्यांना देय निधी वेळेत देण्यासाठी केंद्रसरकारनेच कर्ज घ्यावे आणि राज्यांना ती रक्कम द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.


केंद्र सरकारकडून राज्यांना दिलेल्या रकमेची वसुली सेसची कालमर्यादा वाढवून करावी व संपूर्ण वसुली होईपर्यंत सेसचा कालावधी वाढवण्यात यावा अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.


देशातील सर्वात प्रगत आणि आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्रासमोर, कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट अभूतपूर्व आहे, या संकटावर मात करण्याचा आमचा निर्धार असून त्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारनेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. राज्यांच्या उत्पन्नाचा वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटी हा मुख्य स्त्रोत असल्याने केंद्र सरकारने ‘जीएसटी’पोटी राज्यांना देय रक्कम व थकबाकी वेळेत द्यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटी परिषदेत केली.


केंद्र सरकारने वडीलबंधूची भूमिका बजावत महाराष्ट्रासह अन्य राज्यांनाही आर्थिक संकटातून बाहेर काढावे ही केंद्राने स्विकारलेली जबाबदारी व  कर्तव्यसुद्धा असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटी परिषदेत महाराष्ट्राची तसेच अन्य राज्यांचीही बाजू मांडली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com