नाईक आत्महत्या प्रकरण केवळ सुडभावनेनं पुन्हा उघडलं..चंद्रकांतदादाचा आरोप  - Arnab Goswami's arrest is an incident that strangles Indian democracy Chandrakant Patil alleges | Politics Marathi News - Sarkarnama

नाईक आत्महत्या प्रकरण केवळ सुडभावनेनं पुन्हा उघडलं..चंद्रकांतदादाचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

चंद्रकांत पाटील म्हणाले, "भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी ही घटना आज घडली आहे. मी  या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.

मुंबई : "पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणाची केस 2018 मध्येच बंद झाली होती, ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली आहे," असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सीआयडीने त्यांच्या निवासस्थानी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर पाटील बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी ही घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. मी महाराष्ट्रातील जनतेला आणि आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण आपल्या पद्धतीने राज्य  सरकारचा आंदोलन करून विरोध करा, उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा."

काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे की हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात. महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही. आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता देखील थांबवणार," असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. पोलिस अर्णब यांना घेऊन अलिबागकडे रवाना झाले आहेत. 

आज सकाळीच सुमारे डझनभर पोलिस अर्णब यांच्या निवासस्थानी गेले. तेथून त्यांना अक्षरशः उचलून पोलिस व्हॅनमध्ये कोंबण्यात आल्याचा आरोप रिपब्लिक टिव्हीने केला आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली.  

हेही वाचा : संजय राऊत म्हणाले, "सरकार सुडभावनेनं काम करीत नाही.. 

मुंबई : "महाराष्ट्र सरकार सुडभावनेनं काम करीत नाही, पोलिसांकडे पुरावे असतील तर कुणावरही कारवाई करू शकतात, " असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. यानंतर पत्रकारांशी राऊत बोलत होते. "महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. येथे कुणाचाही आवाज दाबला जात नाही, पोलिसाकडे सबळ पुरावे असल्याशिवाय ते कुणालाही अटक करीत नाहीत," असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. खासदार संजय राऊत म्हणाले, "अभिनेता सुशांतसिह प्रकरणात राज्य सरकारवर अर्णब गोस्वामी यांनी आरोप केले आहेत, याबाबतही चैाकशी व्हायला पाहिजे. या राज्यात कोणी चुकीचं काम करीत असेल, त्याच्यावर कारवाई करण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत असते, मग ते पत्रकार, अभिनेता, वकील कुणीही का असो. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. जे चुकीचं काम करतील त्यांच्यावर कारवाई होणारच" 
 
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख