गरीब-श्रीमंत म्हणून आंबेडकरांनी मराठा समाजात फूट पाडू नये  - Ambedkar should not divide the Maratha community as rich-poor: Ashok Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

गरीब-श्रीमंत म्हणून आंबेडकरांनी मराठा समाजात फूट पाडू नये 

अभय कुळकजाईकर 
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

मराठा आरक्षणासंदर्भात येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री बाजू मांडतील.

नांदेड : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे काही निर्बंध आले आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्ष, विविध संघटना तसेच वकिलांकडून याबाबतची बाजू समजून घेतली आहे.

येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री याबाबत बाजू मांडतील, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे सावर्जनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. 17 सप्टेंबर) दिली. 

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयावर सध्या कुठलेही भाष्य करता येणार नसल्याचे सांगून चव्हाण म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजात गरीब किंवा श्रीमंत असे सांगून फूट पाडू नये. मराठा समाजात आपापसांत कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणासंदर्भात चव्हाण यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा आरक्षणासंदर्भातील सद्यस्थितीवर चव्हाण यांनी या वेळी माहिती दिली. मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकावे, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, असे चव्हाण म्हणाले

ते म्हणाले की, मागील सरकारने विधिमंडळात याबाबत प्रस्ताव आणल्यानंतर एकमताने तो पारित केला आणि सर्वांनीच पाठिंबा दिला. त्यामुळे दुमत असण्याचे कारण नाही. मागास आयोगाच्या शिफारसी, मुंबई उच्च न्यायालय आणि विधीमंडळ या सगळ्यांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला. सातत्याने आणि वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात जवळपास तज्ज्ञ वकिलांनी या संदर्भात बाजू मांडली आहे. सरकारकडून कुठलीही कमतरता ठेवण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

आक्षेप असतील तर संघटनांनीही वकील द्यावा 

सरकार आरक्षणाच्या बाजूनेच असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले की, आता सर्वोच्च न्यायालयासमोर आपली बाजू मांडायची आहे. संघटनांना काही आक्षेप असतील तर त्यांनी देखील इतरांसारखे वकील उभे करुन बाजू मांडावी, त्यास आमची हरकत नाही. सर्वोच्च न्यायालयासमोर बाजू मांडण्यासाठी दोन, तीन पर्याय आहेत. त्यातील कुठला मुद्दा सोयीचा आणि न्यायालयात टिकेल, त्याची चर्चा करुन मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर अन्य पर्यायावरही चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. वैद्यकीय, अभियांत्रिकीसह इतर जागांसदर्भात, तसेच नोकरी आणि सारथीबाबतही मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 

सर्वांची भूमिका एकच 

मराठा आरक्षणावरून कुठलेही राजकारण करायचे नाही. सर्वांची भूमिका एकच असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले की, यात समन्वयातून मार्ग काढत यश कसे मिळेल, याचे प्रयत्न सुरु आहेत. जनतेच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा सुरु ठेवली असून येत्या दोन तीन दिवसांत सरकारची भूमिका ते स्पष्ट करतील, अशी ही माहिती त्यांनी दिली. 

मेटेंचा बोलविता धनी शोधा 

विनायक मेटे यांनी केलेल्या आरोपांवर हा विषय राजकारणाचा नसून मी प्रामणिकपणे प्रयत्न करत आहे. हा विषय मार्गी लागावा, यासाठी सुरूवातीपासून आम्ही प्रयत्नशील असून मेटेंचा बोलविता धनी कोण आहे, याचाही तुम्हीच शोध घ्या, असेही ते म्हणाले. 

कोरोना परिस्थिती चिंताजनक 

कोरोना संसर्गाबाबत अजूनही परिस्थिती चिंताजनक असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासह ऑक्‍सिजन आणि बेडची व्यवस्था करण्यासंदर्भात माझे आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच सचिव प्रदीप व्यास आदींशी बोलणे झाले असल्याचीही माहिती चव्हाण यांनी दिली.  या वेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर आदी उपस्थित होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख