शिवसेनेचा भाजपवर पुन्हा वार.. - Akola shiv sena attack bjp again | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचा भाजपवर पुन्हा वार..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 डिसेंबर 2020

शिवसेनाही अकोला महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपवर पलटवार करण्याची कोणतीही संधी सोडत नाही.

अकोला : राज्यात एकेकाळी मित्र असलेल्या शिवसेना व भाजपमध्ये आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत वितुष्ट आले आहे. भाजप राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेनेला घेरण्याची एकही संधी सोडत नाही, तसेच शिवसेनाही अकोला महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपवर पलटवार करण्याची कोणतीही संधी सोडत नाही.

काल झालेल्या मनपाच्या स्थायी समितीसभेत पुन्हा एकदा महिला व बालकल्याण विभागाच्या योजनातील अनियमितता आणि विकास कामांच्या निविदा ‘मॅनेज’ करण्याचा आरोपावरून शिवसेनेने भाजपवर वार करीत सभेतच भ्रष्टाचाराचे आरोप करणारे फलक झळकाविले. त्यामुळे शांततापूर्ण मार्गाने सभेत ‘वादळी’ चर्चा घडून आली.महानगरपालिकेतील सायकल वितरण योजनेच्या अनियमिततेचा चौकशी अहवाल मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत सादर करण्यात आला. 

त्यासोबतच हळदीकुंकू कार्यक्रमाचा अहवालही सादर केला. या दोन्ही योजना सत्ताधारी भाजपच्या महिला व बालकल्याण सभापतींनी राबविल्या होत्या. योजना सादर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडून ती योग्य प्रकारे राबविली जाते किंवा नाही हे बघणेही सत्ताधाऱ्यांचेच काम आहे. त्यात सत्ताधारी कमी पडत असल्याने दोन्ही योजनेच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी तब्बल सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लागला. यावरून सत्‍ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी केला. त्यामुळे भाजप सदस्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. याच मुद्यावर खडाजंगी झाली. 

अखेर दोन्ही चौकशी अहवालाचे सभागृहात वाचन करण्यात आले. त्यानंतर विकास कामांच्या निविदा व मनपा कार्यालयातील विद्युत उपकरणे बदलण्याचा मुद्दा चर्चेला आला असता शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी भाजपवर पुन्हा सोयीच्या कंत्राटदारांना कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रिया मॅनेज केली जात असून, त्यासाठी सभागृहात विषय संख्या बळावर पारीत केले जात असल्याचा आरोप केला. त्यावरही वादळी चर्चा झाली. त्याला विरोध म्हणून शिवसेना सदस्यांनी सभागृहात सत्ताधारी व प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे स्लोगन असलेले फलक झळकाविले.
 
सायकल घोटाळ्यात मुख्याध्यापकांवर ठपका

सायकल वितरणासाठी पालकांकडून सादर करण्यात आलेली देयक ही अकोट, वाशीम, कारंडा लाड आदी ठिकाणच्या दुकानातील आहेत. अकोल्यातील ज्या दुकानांची नावे देयके सादर करण्यात आली, त्‍या दुकानातून सायकल विक्री होतच नाही. असे असतानाही पालकांना केवळ देयक सादर करण्यास लावणाऱ्या मुख्याध्यापकांवर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. मनपाच्या ३३ शाळांपैकी २९ शाळांच्या मुख्याध्यापकांनीच खुलासा सादर केला. १०२४ पालाकांनी सायकलचे देयके सादर केली. त्यात १५० पालकांनीच प्रत्यक्षात सायकल खरेदी केली असे अहवालात नमुद आहे. 
 
शिक्षणाधिकाऱ्यांसह दोघांना नोटीस
सायकल वाटप व हळदीकुंकू कार्यक्रम अनियमितात प्रकरणी शिक्षणाधिकारी शाहिन सुलताना व नंदिनी दामोदर यांना महापालिका आयुक्तांनी सभेच्या एक दिवस आधी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीसचा काळ पूर्ण होण्यापूर्वीच दामोदर यांची दुसऱ्या विभागात बदलीही करण्यात आली. त्यावर शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतला.
 
हळदीकुंकू कार्यक्रमाची खोटी देयके
मकरसंक्रातीच्या निमित्ताने मनपाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमासाठी बिछायत केंद्राची व मिठाईवाल्याची खोटी देयके सादर करण्यात आली असल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता खोटी देयके सादर करणाऱ्यांवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख