अकोल्यातही भाजपमध्ये उलथापालथ..? अनेक जण राष्ट्रवादीच्या वाटेवर.. - In Akola district some people from BJP are on the path of NCP | Politics Marathi News - Sarkarnama

अकोल्यातही भाजपमध्ये उलथापालथ..? अनेक जण राष्ट्रवादीच्या वाटेवर..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

अकोला जिल्ह्यात भाजपमधील काही जण राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

अकोला : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील खडसे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाते. काही जणांनी भाजपला रामराम ठोकण्याची तयारी केली आहे. नाथांभाऊचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अकोला जिल्ह्यात भाजपमधील काही जण राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.  येत्या काही दिवसातच भाजपमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षातील अकोला जिल्ह्यात असलेली अस्वस्थता नाथाभाऊच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशासोबतच उफाळून आली आहे. माजी आमदार नारायणराव गव्हाणकर आणि माजी नगरसेवक गोपी ठाकरे हे तर नाथाभाऊंचे निकवर्तीय मानले जात होते. पक्षाचे माजी उपाध्यक्ष गजानन भटकर यांच्यासह अनेकांनी पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. अकोला जिल्ह्यात एकनाथ खडसे यांचे अनेक समर्थक आहेत. त्यात पक्षाच्या विविध पदांवर काम करणाऱ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे

भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गजानन भटकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे. भटकर यांनी नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले. मात्र त्यांच्यासोबत तेही राष्ट्रवादीत जाणार का, याबाबत बोलताना त्यांनी भाजप सोडणार हे नक्की असल्याचे सांगून अद्याप कोणत्या पक्षात जायचे हे निश्चित नसल्याचे सांगितले.
 
भाजपमधून सीमोल्लंघन करत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा धुळे- नंदुरबार जिल्ह्यात थेट प्रभाव नसला तरी त्यांच्या अप्रत्यक्ष प्रभावाचा "राष्ट्रवादी"ला थेट लाभ मिळू शकतो. तसेच, या जिल्ह्यातील भाजपच्या नाराज गटालाही खडसेंबरोबर सीमोल्लंघनाची वाट मोकळी झाली आहे. त्यांच्या "राष्ट्रवादी'तील अधिकृत प्रवेशानंतर स्थानिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींकडे धुळे- नंदुरबार जिल्ह्याचे बारीक लक्ष असेल. 
 

ज्येष्ठ नेते खडसे यांना ज्याप्रकारे राज्याच्या निर्णय प्रक्रियेतून डावलले जात होते. त्याप्रमाणे भाजपमधील नाराज गट, मूळ भाजपमधील पूर्वीचा निष्ठावंत गट जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेत डावलला गेला. ज्यांनी भाजपच्या बांधणीत, पक्ष उभारणीच्या प्रक्रियेत खस्ता खाल्या त्यांच्यात जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेत डावलले गेल्याची भावना आजही कायम आहे. असा निष्ठावंत गट निष्ठा प्रकट करणे आणि राग व्यक्त करण्यासाठी खडसेंबरोबर जाऊ शकतो. 
 
धुळ्यात जी मंडळी मोठ्या अपेक्षेने भाजपमध्ये गेली. नगरसेवक झाले. त्यांनी नगरसेवक म्हणून काय- काय करता येईल, अशी काही स्वप्ने पाहिली. त्याची पूर्तता दोन वर्षांत होऊ शकलेली नाही. किंबहुना, सत्तेची फळे चाखता आलेली नाहीत. उलट ठराविक गट वर्चस्व राखून असून त्याने नाराजांना गोंजारण्यासाठी महापालिका प्रशासनावर खापर फोडण्यात धन्यता मानली आहे. यातील नाराज गटाला खडसेंबरोबर सीमोल्लंघनाची वाट मोकळी झाल्याचे मानले जाते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख